काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवर टीका; उत्तर मुंबईत महायुतीचे शक्तिप्रदर्शन!

विशेष प्रतिनिधी

मुंबई: विरोधकांकडून सातत्याने चालवल्या जाणाऱ्या कथित अपप्रचाराला आणि फेक नरेटिव्हला जशास तसे उत्तर देण्यासाठी उत्तर मुंबईमध्ये भाजप-महायुतीच्या वतीने अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन करण्यात आले. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री तथा स्थानिक खासदार पीयूष गोयल यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ महामोर्चाने विरोधकांच्या आरोपांची लक्तरे वेशीवर टांगली. “निवडणुका जिंकल्या की लोकशाही जिवंत आणि पराभव झाला की ईव्हीएम व मतचोरीचे रडगाणे गाणारे राहुल गांधी पूर्णपणे बिथरले आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देशाच्या पंतप्रधानांच्या वडिलांवर पातळी सोडून केलेली टीका ही अत्यंत लाजीरवाणी असून, यासाठी देश त्यांना कधीही माफ करणार नाही,” अशा कडक शब्दांत पीयूष गोयल यांनी काँग्रेसवर तोफ डागली.

या महामोर्चामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) या महायुतीच्या सर्वच प्रमुख घटकांचे नेते, लोकप्रतिनिधी आणि हजारो नागरिक रस्त्यावर उतरल्याने उत्तर मुंबईत महायुतीचे मोठे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले.

जनसागराचा ‘अराजकता हटाव’साठी एल्गार!

बोरीवली (पश्चिम) येथील गोराई-गांधी चौकातील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या महामोर्चाला भव्य स्वरूपात प्रारंभ झाला. ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ आणि ‘देश का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान’ अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

या रॅलीत केवळ राजकीय कार्यकर्तेच नव्हे, तर वकील, डॉक्टर, विविध सामाजिक महिला संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी संघटना आणि सामान्य देशभक्त नागरिक हजारोच्या संख्येने तिरंगा व पक्षाचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. कांदिवली (पश्चिम) येथील महावीर नगर मधील सप्ताह मैदानावर एका विराट जनसभेत या रॅलीचे रूपांतर झाले.

एकाच व्यक्तीचे नाव 3 ठिकाणी का असावे?

निवडणूक आयोगाच्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवरून विरोधक करत असलेल्या आरोपांवर बोलताना पीयूष गोयल म्हणाले, “काँग्रेसने पराभवाच्या भीतीने आतापासूनच रडीचा डाव सुरू केला आहे. देशात बेकायदेशीर आणि अनधिकृतपणे राहणाऱ्या घुसखोरांना देशाने का सहन करायचे? एकाच मतदाराचे नाव वेगवेगळ्या 3 ठिकाणी कसे असू शकते? मतदार यादी पारदर्शक आणि स्वच्छ करणे हा गुन्हा आहे का?”


खोट्या नरेटिव्हचा पर्दाफाश

“कधी संविधानाला धोका असल्याचे भासवले जाते, कधी ईव्हीएमच्या नावाने रडगाणे गायले जाते, तर कधी पेपरफुटीचे खोटे नरेटिव्ह उभे केले जातात. मात्र, देशातील सजग जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून विरोधकांचे हे राजकीय षड्यंत्र कधीही यशस्वी होणार नाही.”

“लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर काँग्रेसला कोणत्याही प्रकारची अराजकता पसरवू दिली जाणार नाही.”

राहुल गांधींचे नेतृत्व दिशाहीन!

काँग्रेसवर थेट राजकीय वार करताना केंद्रीय मंत्र्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. “काँग्रेस ज्या ज्या राज्यांत निवडणुका जिंकते, तिथे लोकशाही सुरक्षित असते आणि पराभव झाला की लगेच संस्थांवर खापर फोडले जाते. मग जेव्हा काँग्रेस जिंकली होती, तेव्हा त्यांनी मतचोरी केली होती का? राहुल गांधी यांचे नेतृत्व पूर्णपणे दिशाहीन आणि नेतृत्वविहीन झाले आहे.”

संविधान व न्यायालयावर अविश्वास

“काँग्रेस नेते रोज उठून देशाची सर्वोच्च न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग आणि संविधानावर जाहीर अविश्वास दाखवून देशाची बदनामी आंतरराष्ट्रीय स्तरावर करत आहेत.” याप्रसंगी त्यांनी माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या सुसंस्कृत राजकारणाच्या आठवणींना उजाळा देत राजकीय विरोध करताना देशाची प्रतिमा मलीन न करण्याचा सल्ला दिला.

महायुतीचे दिग्गज नेते एकाच मंचावर एकवटले

उत्तर मुंबईतील या जनआंदोलनात महायुतीची संपूर्ण स्थानिक व प्रादेशिक फळी एकजुटीने मैदानात उतरली होती. उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष दीपक (बाळा) तावडे यांनी प्रास्ताविकातून आंदोलनाची पार्श्वभूमी मांडली. सप्ताह मैदानावर राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनाने या महामोर्चाची आणि जनसभेची सांगता झाली.

Piyush Goyal Leads Mahayuti Rally in North Mumbai Against Congress

 

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात