विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधान परिषद निवडणुकीवरून सत्ताधारी भाजप व शिवसेना यांच्यात सुरू झालेला वाद चिघळला आहे. भाजपने आता शिवसेनेला थेट युती टिकविण्याचाच अल्टीमेटम देत पुण्याचे रवींद्र धंगेकर व छत्रपती संभाजी नगरचे अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महायुती विरोधात काम करणारे रवींद्र धंगेकर अब्दुल, सत्तार यांच्यावर कारवाई करा, महायुती टिकवायची असेल तर झारीतले शुक्राचार्य रोखा, असा इशारा शिवसेनेला देत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत रवींद्र धंगेकर यांच्यावर हल्लाबाेल केला. धंगेकर यांचा माकडछाप असा उल्लेख करत बन म्हणाले, ज्यांनी राजकीय कारकिर्दीसाठी 12 पक्ष फिरले, ज्यांच्या घरातील लोकांचे पुणे महापालिकेत डिपॉझिट जप्त झाले आणि ज्यांना पुणेकरांनी लोकसभा व विधानसभेत घरी बसवले, त्या ‘माकडछाप’ व्यक्तीने देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर बोलण्याची लायकी नाही.
महायुतीत राहून पुण्यात भाजप उमेदवार स्मिता जाधव यांच्याविरोधात अधिकृत सोशल मीडिया पेजवरून प्रचार करणाऱ्या रवींद्र धंगेकरांवर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडपणे बंडखोरी करणाऱ्या अब्दुल सत्तारांवर शिवसेना काय कारवाई करणार? अमरावतीत बंडखोरांवर भाजपने ६ वर्षांसाठी निलंबनाची कुऱ्हाड चालवली, मग शिवसेनेनेही धंगेकर आणि सत्तारांवर तशीच कठोर कारवाई करून युतीधर्म पाळावा.
बन म्हणाले, “ज्यांना एका पक्षात आपले राजकीय करिअर घडवता आले नाही, जे मनसे, काँग्रेस, शिवसेना करत 12 घरे फिरून आले, त्या माकडछाप व्यक्तीची अवस्था ‘माकडाच्या हाती कोलीत’ अशी झाली आहे. ज्यांना स्वतःच्या कुटुंबातील दोघांचे डिपॉझिट महापालिकेत वाचवता आले नाही, ते आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर टीका करत आहेत. आम्ही अभाविप पासून काम करत, पत्रकारिता करून भाजपचे कमळ हातात घेतले आहे. धंगेकरांसारखे 12 चिन्ह आणि 12 पक्ष बदलून स्वार्थासाठी उड्या मारणारा मी कार्यकर्ता नाही. त्यामुळे अशा उथळ नेत्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App