विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात आयोजित एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने हे नेते एकत्र आले. विशेष म्हणजे, सार्वजनिक कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आल्याने या भेटीबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्रातील व्यंगचित्रकलेचा 100 वर्षांचा प्रवास उलगडणाऱ्या या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी राज्यातील तीन प्रमुख नेते एकाच ठिकाणी उपस्थित होते. कार्यक्रमाचा उद्देश सांस्कृतिक असला, तरी सध्याच्या राजकीय परिस्थितीत या भेटीला विशेष महत्त्व दिले जात आहे.
पुस्तक प्रकाशनाच्या औपचारिक कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे या भेटीत नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
राज्यात सध्या विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री आणि ठाकरे बंधू यांची एकत्रित उपस्थिती लक्षवेधी ठरली. मात्र, बंद दाराआड झालेल्या चर्चेचा तपशील किंवा त्यामागील नेमका उद्देश स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे या भेटीवरून राजकीय समीकरणे बदलणार का, याबाबत केवळ अंदाज व्यक्त केले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App