रवीकिरण सासवडे
बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या पुरुषोत्तम जगताप यांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. येथील मतदारांनी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहोत असा संदेश देत अक्षरशः जगताप यांच्या पॅनलचा धुव्वा उडवला. या निवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्ष संघटनेमधील आपले स्थान अधिक मजबूत केल्याचे मानले जात आहे. हा निकाल सर्वार्थाने सुनेत्रा पवार यांच्यासाठी महत्त्वाचा होता. यामुळे सुनेत्र पवार नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाला आहे. या निवडणुकीमध्ये बंडखोरांची पळताभुई थोडी झाली. 21-0 अशा फरकाने विरोधकांचा सुपडा साफ झाला. तर युगेंद्र पवार यांचे पॅनल तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक गाजली ती विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या बंडखोरीमुळे. खरे तर तेरा वर्षे त्यांना कारखान्याचे अध्यक्षपद देऊन सुद्धा पक्षाच्या विरोधात जात भाजपची संधान साधत जगताप यांनी स्वतंत्र पॅनल उभा केला. 13 वर्षे चेअरमन पद भोगलेल्या जगताप यांचा यंदा पत्ता कट होणार अशी कुजबुज सुरू असल्याने जगताप यांनी पक्षाच्या विरोधात बंड केले अशी चर्चा सभासदांमध्ये होती. या चर्चेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शुभारंभ व सांगता सभेमध्ये केलेले वक्तव्य कारणीभूत ठरले. या सभांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या होत्या ‘कारखाना ही कोणाची खासगी मालमत्ता नाही ती सभासदांची संपत्ती आहे.’ त्यामुळेच चेअरमन पदाची भाकरी फिरवली जाणार अशी भीती वाटल्याने जगताप विरोधात गेले.
त्यांनी भाजप नेते व माजी आमदार संजय जगताप यांच्या साथीने पॅनल उभा केला. या पॅनलला दिवंगत नेते अजित पवार यांचे नाव दिले. तसेच अजितदादांचा फोटो देखील वापरला. या नावावरून व अजितदादांच्या छायाचित्रावरून ही वादंग माजले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. मात्र जगताप जुमानले नाहीत. अजितदादा हवेत मात्र अजितदादांच्या कुटुंबाने घेतलेला निर्णय नको, अशी प्रचाराची रणनीती तिथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या निवडणुकीमध्ये राबवण्यात आली. या मुद्द्यावर जगताप यांना मात्र उत्तर देणे सुचले नाही. स्वच्छ व पारदर्शक कारभाराबाबत ते बोलत राहिले. मात्र हा कारभार करताना अजित दादांचे देखील मोलाचे सहकार्य मिळत होते, ही बाजू मात्र त्यांनी दाखवली नाही. प्रचाराचा संपूर्ण प्रकाशझोत आपल्यावरच कसा राहील हे जगताप यांनी पाहिले. सभासदांना नेमके तेच आवडले नाही. ‘मी केले’ असे सांगण्यापेक्षा ‘आम्ही केले’ हे सांगणे जास्त गरजेचे होते अशी चर्चा सभासदांमध्ये होती.
दरम्यान, या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, व युवा नेते जय पवार हे पहिल्या दिवसापासून अखेरपर्यंत लोकांमध्ये जात राहिले. या निवडणुकीमध्ये खास करून जय पवार यांच्या वतकृत्वामध्ये अधिक प्रगल्भता दिसून येऊ लागल्याने सभासदांचा ओढादेखील त्यांच्याकडे वाढला. जय पवार हे साध्या सोप्या भाषणांनी आपले मुद्दे सभासदांना पटवून देऊ लागले. एका बाजूला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत पक्षात बंडखोरी करणाऱ्या एकदा बाहेर गेला तर तो कायमचाच बाहेर राहणार, मी दादांसारखी नाही दादा खूप मोठ्या मनाचे होते, असे वक्तव्य करून बंडखोरांना गर्भित इशारा दिला. यापूर्वी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा असणारा मवाळ व भावनिक वावर निवडणुकीमध्ये मात्र आक्रमक स्वरूपाचा दिसला.
कदाचित येथून पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्याही निवडणुकांमध्ये बंडखोरी होऊ नये आणि ती झाली तर बंडखोरांची काय अवस्था मी करू शकते याची चुणूक या निमित्ताने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दाखवली आहे. पवार यांच्या दृष्टीने हे गरजेचे देखील होते. पक्ष संघटना नियंत्रणात ठेवण्यासाठी आक्रमक व कठोर निर्णय नेतृत्वाला घ्यावे लागतात हेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या कृतीतून दाखवले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App