कारखान्याचे हित सर्वोच्च; बंडखोरांना सुनेत्रा पवारांचा सूचक इशारा

Sunetra Pawar

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या सांगता सभेत कारखान्याच्या हिताला प्राधान्य देण्याचे आवाहन

विशेष प्रतिनिधी

बारामती : “कोण आपला आणि कोण परका, अशी विभागणी करण्यापेक्षा कारखान्याचे हित सर्वोच्च मानले पाहिजे. मी शांत आहे, याचा अर्थ कमजोर आहे, असा कोणीही घेऊ नये,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बंडखोरांना सूचक इशारा दिला. निवडणुकीच्या राजकारणापलीकडे जाऊन सभासदांनी कारखान्याच्या भवितव्याचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा शुक्रवारी (ता. ९) सोमेश्वर येथे पार पडली. या सभेत सुनेत्रा पवार बोलत होत्या. Sunetra Pawar

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा केवळ ऊस गाळप करणारा उद्योग नसून हजारो शेतकरी सभासदांच्या संसाराचा आधार आहे. शेतकरी, कामगार आणि त्यांची कुटुंबे कारखान्याशी जोडलेली असल्याने कारखान्याची प्रगती म्हणजे या सर्वांच्या आयुष्यातील प्रगती आहे. कारखाना हा कोणत्याही एका व्यक्तीची मालमत्ता नसून सभासद हेच त्याचे खरे मालक आहेत, असे पवार यांनी स्पष्ट केले.

अजितदादांच्या निधनानंतर होत असलेली ही पहिलीच निवडणूक आहे. त्यांच्या अचानक जाण्याने निर्माण झालेली पोकळी आजही सर्वांना जाणवत आहे, असे सांगत त्यांनी बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका मांडली.

निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली असून कार्यकर्ते आणि सभासदांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. अफवांवर विश्वास न ठेवता वस्तुस्थिती समजून घ्यावी. गावातील नाती, मैत्री आणि भावकी जपत कारखान्याच्या हिताला प्राधान्य देणारा निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

दुष्काळी परिस्थितीमुळे आगामी काळात आव्हाने

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याची कमतरता यामुळे आगामी काळात सोमेश्वर कारखान्यासमोर अनेक आव्हाने उभी राहणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले. यंदाच्या गाळप हंगामासोबतच पुढील वर्षासाठी ऊस उपलब्धतेचे नियोजन आतापासून करणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.

पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर, शेतीचे योग्य नियोजन आणि कारखान्याचे सक्षम व्यवस्थापन यावर भर द्यावा लागेल. शेतकरी, ऊस उत्पादन आणि कारखान्याची आर्थिक स्थिती या परस्परांशी जोडलेल्या बाबी असल्याने त्यांचा एकत्रित विचार करून पुढील वाटचाल करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Factory’s interests paramount; Sunetra Pawar issues a pointed warning to rebels.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात