ज्यांना यायचं असेल त्यांनी आमच्यात यावं, आम्ही कुणाच्यात जाणार नाही’; विलिनीकरण चर्चांवर शरद पवारांची स्पष्ट भूमिका

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत तसेच आपल्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भविष्यात भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी, अर्थात एनडीएसोबत जाणार असल्याच्या राजकीय चर्चांवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. “आम्ही कुणाच्यात जाणार नाही. ज्यांना आमच्यासोबत यायचं असेल त्यांनी आमच्यात यावं. आमचा पक्ष स्वतंत्र पक्ष म्हणून आपली वाटचाल करणार असून तो अधिक शक्तिशाली करण्यासाठी आपण काम करणार आहोत,” असे पवार यांनी पक्षाच्या बैठकीत सांगितले. Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक सोमवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पक्ष संघटना, एमपीएससीशी संबंधित मुद्दे, एसआयआर प्रक्रियेवरील वाद तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बैठकीत चर्चा करण्यात आली. खासदार, आमदार तसेच जिल्हा आणि तालुका स्तरावरील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

बैठकीत बोलताना शरद पवार यांनी पक्षाच्या भवितव्याबाबत सुरू असलेल्या चर्चांचा उल्लेख केला. “मघाशी बोलताना प्रदेशाध्यक्षांनी एक वाक्य वापरले. आमच्याबाबत काही उलटसुलट चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचा प्रमुख म्हणून मी स्पष्ट सांगतो की, आपल्याला शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस अधिक शक्तिशाली करायची आहे,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांसमोर पक्षाची दिशा स्पष्ट केली.


‘मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महाविकास आघाडीने गुंडाळला’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप


गेल्या काही महिन्यांपासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपप्रणीत एनडीएच्या जवळ जाऊ शकते, अशा स्वरूपाच्या राजकीय चर्चा सुरू होत्या. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याची शक्यता असल्याच्याही चर्चा वेगवेगळ्या स्तरांवर होत होत्या. या पार्श्वभूमीवर पवार यांनी आपण एनडीएमध्ये जाणार नसल्याचे सांगत, “आम्ही कुठेही जाणार नाही. आम्ही कुणासोबत जाणार नाही. ज्यांना यायचं आहे त्यांनी आमच्यासोबत यावं,” असे म्हटले.

त्यांच्या या विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना नवा संदर्भ मिळाला आहे. मात्र, पवार यांनी कोणत्याही नेत्याचे नाव घेऊन थेट प्रस्ताव मांडलेला नसून, आपल्या पक्षाचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व कायम ठेवण्यावर भर दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर ताकदीने काम करत असल्याचे सांगत पक्षाच्या भवितव्याबाबत होणाऱ्या अंदाजांना महत्त्व देऊ नये, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

राजकीय चर्चांबरोबरच राज्यातील दुष्काळी परिस्थिती हा बैठकीतील महत्त्वाचा विषय होता. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी पवार यांनी केली. पक्षाच्या बैठकीत सुमारे अडीच तास विविध मागण्यांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. या मागण्यांसंदर्भात राज्य सरकारला निवेदन देण्यात आले असून पुढील काही दिवसांत सरकारने त्यावर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रविवारी शरद पवार यांनी पक्षाच्या लोकप्रतिनिधींशी ‘सिल्व्हर ओक’ येथे संवाद साधला होता. त्यानंतर राज्य सरकारकडे दुष्काळग्रस्त भागांसाठी विविध मागण्या करण्यात आल्या. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतही या मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीत पवार यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, अर्थात AI या तंत्रज्ञानावरही भाष्य केले. राजकारण, निवडणुका आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल याचा अभ्यास करण्याचा सल्ला त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. कार्यकर्त्यांना AI संदर्भात प्रशिक्षण हवे असल्यास बारामतीमध्ये त्याची व्यवस्था करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

Sharad Pawar clears the air on merger talks

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात