जुहूतील बंगल्याचे काम थांबवण्याची नोटीस; सलून-स्पाच्या व्यावसायिक वापरावरून वाद
विशेष प्रतिनिधी
मुंबई: अभिनेता अजय देवगणच्या मुंबईतील जुहू येथील बंगल्याशी संबंधित प्रकरण सध्या चर्चेत आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने जुहूतील देवगण कुटुंबाच्या मालकीच्या बंगल्यात सुरू असलेल्या प्रस्तावित सलून आणि स्पाच्या कामाला स्थगिती देण्याची नोटीस बजावली आहे. संबंधित जागेच्या व्यावसायिक वापरासाठी आवश्यक परवानग्या आणि कागदपत्रांबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पालिकेने ही कारवाई केली आहे.
अजय देवगणचा जुहूतील एन.एस. रोड क्रमांक 11, प्लॉट क्रमांक एस-10 येथे सुमारे 7,802 चौरस फुटांचा बंगला आहे. या मालमत्तेत सलून आणि स्पा सुरू करण्यासाठी काम सुरू असल्याचे समोर आले. मात्र, या जागेचा प्रस्तावित व्यावसायिक वापर करण्यासाठी आवश्यक पालिका परवानगीबाबत कापोल सहकारी गृहनिर्माण संस्थेने आक्षेप घेतला.
सोसायटीकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर बीएमसीच्या के-वेस्ट विभागातील इमारती व कारखाने विभागाने प्रकरणाची पाहणी केली. त्यानंतर मालमत्ता मालकांकडे संबंधित कामासाठी आवश्यक कागदपत्रे आणि मंजुऱ्या सादर करण्यास सांगण्यात आले.
‘मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महाविकास आघाडीने गुंडाळला’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप
कापोल सहकारी गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशांनी प्रस्तावित व्यावसायिक वापराबाबत चिंता व्यक्त केली आहे. बंगला व्यावसायिक कारणांसाठी वापरला गेल्यास परिसरात बाहेरील नागरिकांची वर्दळ वाढू शकते, तसेच पार्किंग, सुरक्षा आणि आवाजाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
म्हणूनच ही केवळ अजय देवगण यांच्या मालमत्तेची बाब राहिलेली नसून, संबंधित मालमत्तेचा वापर ज्या पद्धतीने केला जाणार आहे, त्यासाठी सोसायटीचे नियम आणि महापालिकेच्या परवानग्या पूर्ण आहेत का, हा मुख्य मुद्दा बनला आहे.
ही मालमत्ता फ्लोरियन ह्युरेल सलून्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला लीव्ह-अँड-लायसन्स कराराद्वारे देण्यात आल्याची माहिती आहे. 10 ऑगस्ट रोजी झालेला हा करार 5 वर्षांसाठी असल्याचे सांगण्यात आले आहे.
करारानुसार पहिल्या वर्षासाठी दरमहा 16 लाख रुपये भाडे निश्चित करण्यात आले असून, त्यानंतर दरवर्षी भाड्यात वाढ होणार आहे. मात्र, या मालमत्तेचा व्यावसायिक वापर करण्यास परवानगी आहे का, यावरूनच सध्या वाद निर्माण झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App