विशेष प्रतिनिधी
मुंबई : दिवंगत दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचे वडील सतीश सालियन यांनी उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ५०० कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस बजावली आहे. आपल्या मुलीच्या मृत्यूची नव्याने चौकशी व्हावी यासाठी सुरू असलेल्या लढ्याला राजकीय हेतूने प्रेरित ठरविण्याचा प्रयत्न दोन्ही नेत्यांकडून झाल्याचा आरोप नोटिशीत करण्यात आला आहे. दोन्ही नेत्यांनी सात दिवसांत बिनशर्त सार्वजनिक माफी मागावी, तसेच संबंधित विधाने मागे घ्यावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.Disha Salian Case
दिशा सालियन यांचा ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. त्यावेळी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. अलीकडे उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) दिली असून, सीबीआयने गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान, सतीश सालियन यांनी बजावलेल्या नोटिशीत आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्या वक्तव्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे. आपल्या मुलीच्या मृत्यूची कायदेशीर चौकशी व्हावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्याला राजकीय हेतूने प्रेरित, द्वेषपूर्ण किंवा बदनामीच्या उद्देशाने केलेली कारवाई असल्याचे चित्र निर्माण करण्यात आल्याचा आरोप नोटिशीत आहे. अशा वक्तव्यांमुळे आपली प्रामाणिकता, विश्वासार्हता आणि हेतूंवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे सतीश सालियन यांचे म्हणणे आहे.
नोटिशीत दोन्ही नेत्यांकडून लेखी तसेच सार्वजनिक माफीची मागणी करण्यात आली आहे. ही माफी प्रमुख वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी आणि डिजिटल माध्यमांवर प्रसिद्ध करावी, तसेच दोन्ही नेत्यांच्या समाजमाध्यम खात्यांवर किमान तीन मिनिटांचा माफीनामा प्रसिद्ध करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सात दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात आदित्य ठाकरे यांच्यासह डिनो मोरिया, सूरज पांचोली आणि रिया चक्रवर्ती यांच्यासह काही व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App