“भारनियमनावरून पालकमंत्री संतापले; पंढरपूरच्या अधिकाऱ्याने नेमकं काय विधान केलं?”

 

सोलापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या आपत्कालीन विद्युत भारनियमनामुळे नागरिक आणि कृषी पंपधारक शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन भारनियमनाचे योग्य नियोजन करा आणि वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी नागरिकांना पूर्वसूचना द्या, असे कडक निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यातील भारनियमनाबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गोरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महावितरणच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्यासह कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आणि उपअभियंते उपस्थित होते.

दोन दिवसांत चार ते सहा तास भारनियमन

जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या भारनियमनाची माहिती अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना दिली. मागील दोन दिवसांत अनुक्रमे चार आणि सहा तास आपत्कालीन भारनियमन करण्यात आल्याचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी सांगितले.

यावर पालकमंत्री गोरे यांनी नाराजी व्यक्त केली. अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे कृषी पंपधारक शेतकऱ्यांच्या कामात अडथळे निर्माण होतात, तर सर्वसामान्य नागरिकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे आपत्कालीन भारनियमन टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.



भारनियमन करायचं असेल तर आधी कळवा!

वीजपुरवठा खंडित करणे अपरिहार्य असल्यास ग्राहकांना त्याची आधीच माहिती देण्यासाठी प्रभावी व्यवस्था उभारावी, असे गोरे यांनी स्पष्ट केले. भारनियमन किती वेळ राहणार, त्यामागचे कारण काय आणि वीजपुरवठा कधी सुरळीत होण्याची शक्यता आहे, याची स्पष्ट माहिती नागरिकांना मिळाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

तसेच वीजपुरवठ्याबाबत नागरिकांनी फोनवरून किंवा कार्यालयात विचारणा केल्यास अधिकाऱ्यांनी सौहार्दपूर्ण आणि समाधानकारक उत्तरे द्यावीत. नागरिकांशी उद्धटपणे किंवा चुकीच्या पद्धतीने संवाद साधू नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

पंढरपूरच्या अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस

दरम्यान, पंढरपूर विभागीय कार्यालयातील कार्यकारी अभियंत्याने केलेल्या आक्षेपार्ह विधानावर पालकमंत्री गोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावून त्याच्याकडून खुलासा घेण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनीही सर्व विद्युत अधिकाऱ्यांना ग्राहकांच्या भावना लक्षात घेऊन संयमाने आणि जबाबदारीने संवाद साधण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या वीजपुरवठ्याशी संबंधित तक्रारींचे समाधानकारक निराकरण करण्यासाठी आवश्यक ती मदत करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

Guardian Minister furious over load-shedding; what exactly did the Pandharpur official say?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात