खुनाचा कट रचल्याचा आरोप; चार महिन्यांपासून फरार असलेला सरपंच अटकेत

Sarpanch

विशेष प्रतिनिधी

बारामती : अल्पवयीन मुलाचा वापर करून खुनाचा कट रचणारा व त्यासाठी पाच लाख रुपये आणि दोन गावठी पिस्तुले दिल्याचा आरोप असलेला मेडदचा (ता. बारामती ) सरपंच गणेश दत्तात्रय काशीद याला अखेर माळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. २३ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात काशीद याच्यासह सुजित निलेश नाळे याचा सहभाग निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

माळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जून २०२६ रोजी माळेगाव खुर्द येथील तुकाई चौक परिसरात पोलिसांनी गणेश तात्याराम गावडे आणि मयूर विष्णू मोरे यांना गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि कुकरी चाकूसह ताब्यात घेतले होते. त्यांच्याविरुद्ध माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, मेडद येथील अभिजित अर्जुन यादव (रा. मेडद, ता. बारामती ) याच्या खुनाचा कट रचल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.



गणेश गावडे याने जमीन विक्रीतून मिळालेल्या पैशांपैकी आठ लाख रुपयांचा चेक मयूर मोरे याला ४ जून रोजी दिला होता. हा चेक बारामतीतील पीडीसीसी बँकेच्या कसबा शाखेत जमा करून आठ लाख रुपये काढण्यात आले. पोलिसांच्या तपासानुसार, यातील तीन लाख रुपये गणेश काशीद याच्या घरी देण्यात आले, तर पाच लाख रुपये खंडोबानगर परिसरात सुजित नाळे याला देण्यात आले. त्यानंतर काशीद याने नाळे याला दोन गावठी पिस्तुले दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अभिजित यादव याला जिवे मारण्याच्या उद्देशाने हा कट रचण्यात आल्याचा आरोप आहे. अभिजित यादव याचे वडील अर्जुन शंकर यादव व आरोपी गणेश काशीद यांच्यामध्ये राजकीय वैमनस्य असल्याचेही तपासात समोर आल्याचे पोलिसांनी नमूद केले.

या प्रकरणात गणेश काशीद आणि सुजित नाळे यांचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर १२ जून रोजी भारतीय न्याय संहितेतील कलम ६१(२) आणि १०३ सह ५५ ही कलमे वाढविण्यात आली. त्यानंतर काशीद हा फरार झाला होता. अखेर २३ ऑक्टोबर रोजी पोलिसांच्या जाळ्यात सापडला. काशीद याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न आणि खंडणी यांसारखे एकूण १३ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याला पोलीस कोठडी मिळाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास माळेगाव पोलिस करीत आहेत.

Sarpanch, who had been absconding for four months, arrested

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात