विशेष प्रतिनिधी
बारामती : पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांची गरज लक्षात घेऊन उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीला पॉवर हाऊसमधून १,६०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला असून, शनिवारी (ता. २४) सकाळी सांडव्यावरील विसर्ग वाढवून एकूण विसर्ग ४,५०० क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांतील पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. Ujani
उजनी धरण व्यवस्थापन विभागाने दिलेल्या सूचनेनुसार, शुक्रवारी (ता. २३) रात्री दहा वाजल्यापासून पॉवर हाऊस आउटलेटमधून १,६०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांसाठी हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार धरणाच्या सांडव्यावरूनही पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून सांडव्याचा विसर्ग २,९०० क्युसेकपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची सूचना देण्यात आली होती.
त्यानुसार पॉवर हाऊसचे १,६०० आणि सांडव्याचे २,९०० क्युसेक असे एकूण ४,५०० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्याचे नियोजन आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी सहा वाजताच्या धरणाच्या दैनंदिन आकडेवारीनुसार सांडव्यातून १,४०० आणि पॉवर हाऊसमधून १,६०० क्युसेक असा एकूण तीन हजार क्युसेक विसर्ग सुरू होता. पुढील टप्प्यांत पाण्याची गरज आणि परिस्थितीनुसार विसर्गाचे नियमन करण्यात येणार आहे.
धरणात ७७.३८ टक्के उपयुक्त साठा…
उजनी धरणातील २४ ऑक्टोबरच्या सकाळी सहा वाजताच्या नोंदीनुसार धरणाची पाणीपातळी ४९५.७६० मीटर असून, पाण्याचा विस्तार ३०५.८६ चौरस किलोमीटर आहे. धरणात एकूण १०५.११ टीएमसी स्थूल पाणीसाठा, तर ४१.४६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ७७.३८ इतकी आहे. मागील वर्षी याच कालावधीत धरणात १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदा साठा कमी असला, तरी धरणात समाधानकारक उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. विविध पाणीपुरवठा योजनांसाठी उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांना नदीतील विसर्गामुळे दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App