TET Exam : ‘टीईटी’बाबत मोठा संभ्रम! फेरपरीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन? परीक्षा परिषदेकडून महत्त्वाची माहिती

विशेष प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (TET) फेरपरीक्षेबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. २८ जून रोजी झालेली टीईटी परीक्षा भिवंडी येथे पेपरफुटीच्या प्रकरणामुळे रद्द करण्यात आली होती. त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पुढील परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मात्र, फेरपरीक्षा ऑनलाइन घ्यायची की ऑफलाइन, याबाबत शासनाकडून परीक्षा परिषदेला अद्याप अंतिम सूचना मिळालेल्या नाहीत. TET Exam

टीईटी परीक्षा रद्द होऊन जवळपास दोन महिने उलटले आहेत. फेरपरीक्षेच्या आयोजनाबाबत सध्या शासनस्तरावर चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वर्षातून दोन वेळा टीईटी घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, पहिलीच परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द झाल्याने जूनमध्ये नोंदणी केलेल्या सुमारे सहा लाख उमेदवारांचे भवितव्य अधांतरी आहे. फेरपरीक्षेची तारीख कधी जाहीर होणार, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.


ऑनलाइन परीक्षा घेण्याचे मोठे आव्हान

शिक्षक नियुक्तीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याने दरवर्षी परीक्षार्थींची संख्या मोठी असते. पेपरफुटीला आळा घालण्यासाठी आणि परीक्षा अधिक सुरक्षितपणे घेण्यासाठी ऑनलाइन परीक्षा हा पर्याय योग्य मानला जात आहे. मात्र, सुमारे सहा लाख उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी राज्यभर मोठ्या संख्येने संगणक केंद्रे आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे परीक्षा यंत्रणेसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

IBPSकडेही इतर परीक्षांची जबाबदारी

टीईटी परीक्षेचे आयोजन IBPSच्या माध्यमातून केले जाते. मात्र, सध्या IBPSकडे इतर परीक्षांची जबाबदारी असल्याने टीईटीसाठी तारीख निश्चित करण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे फेरपरीक्षा डिसेंबरपर्यंत लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुढील वर्षी तीन वेळा परीक्षा घेण्याचा पर्याय

यंदा टीईटीची फेरपरीक्षा वेळेत घेता आली नाही, तर पुढील वर्षी तीन वेळा परीक्षा घेण्याचा पर्याय विचाराधीन असू शकतो. तसेच शिक्षक उमेदवारांना केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) देण्याचाही पर्याय उपलब्ध असल्याने शिक्षक भरतीवर याचा मोठा परिणाम होणार नाही, अशी माहिती परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मात्र, फेरपरीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन आणि तिची तारीख कधी जाहीर होणार, याबाबत शासनाच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे.

Major confusion regarding TET! Will the re-examination be online or offline?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात