विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त अन्नपदार्थ, नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक उत्पादने तसेच अस्वच्छता आढळणाऱ्या हॉटेल्स, डेअरी आणि दुकानांवर सातत्याने कारवाई सुरू केली आहे. राज्यातील विविध भागांत FDAच्या पथकांकडून छापे टाकून भेसळयुक्त माल जप्त केला जात असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात येत आहेत.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी FDAच्या या कारवाईवर प्रथमच प्रतिक्रिया देताना विभागाच्या कामाचे कौतुक केले आहे.
‘भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई गरजेची’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, भेसळयुक्त पदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारची भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. FDAकडून सध्या सुरू असलेल्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त करत, ही धडक मोहीम यापुढेही सुरू राहील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदेंचीही तुकाराम मुंढेंसोबत बैठक
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांची 11 ऑगस्ट रोजी सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली होती. या बैठकीत FDAकडून सुरू असलेल्या कारवाईची माहिती मुंढे यांनी शिंदे यांना दिली.
दूध, पनीर, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले. गंभीर प्रकरणांमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई तसेच अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याच्या शक्यतेवरही त्यांनी भर दिला.
न्यायालयीन प्रक्रियेत कायदेशीर त्रुटी राहू नयेत, यासाठी अनुभवी कायदेतज्ज्ञांची मदत घेऊन विशेष कायदेशीर पथक तातडीने स्थापन करण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले.
शाहरुख, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला FDAची नोटीस
दरम्यान, FDAच्या कारवाईची व्याप्ती केवळ खाद्यपदार्थ आणि आस्थापनांपुरती मर्यादित राहिलेली नाही. ‘विमल इलायची’च्या जाहिरातीप्रकरणी बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांनाही FDAने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
तुकाराम मुंढे यांनी FDAचा कारभार स्वीकारल्यानंतर विभागाच्या कारवाईला वेग आल्याचे दिसत असून, भेसळ आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कौतुकानंतर FDAची ही मोहीम आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App