कर्करोगासह गंभीर आजारांवर प्रभावी उपचारांसाठी फडणवीसांचा मोठा संदेश; नेमका काय आहे प्लॅन?

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधन आणि नवोन्मेषाला महाराष्ट्र शासनाचे सहकार्य; ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी औषधनिर्मिती कंपन्यांनी संशोधन आणि नवोन्मेषावर अधिक भर द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासन आवश्यक धोरणात्मक आणि अन्य सहकार्य करण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. जागतिक दर्जाची विद्यापीठे, संशोधन संस्था आणि औषधनिर्मिती कंपन्यांनी एकत्रितपणे काम केल्यास या क्षेत्रात मोठी प्रगती साधता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. Fadnavis

ॲस्ट्राझेनेका फार्मा इंडिया लिमिटेडच्या गोरेगाव येथील मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कंपनीचे भारतातील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रवीण राव अक्किनेपल्ली, आशिया विभागाचे उपाध्यक्ष अरुण कृष्णा, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी आणि गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधनाला प्राधान्य

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारताने जागतिक औषधनिर्मिती क्षेत्रात महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. अमेरिका आणि युरोपसारख्या कडक नियमन असलेल्या बाजारपेठांमध्येही भारतीय जेनेरिक औषधांना मोठी मागणी आहे. भारतीय औषधनिर्मिती उद्योगाची गुणवत्ता आणि उत्पादनक्षमता जागतिक स्तरावर सिद्ध झाली आहे. आता या क्षेत्रात संशोधन आणि नवोन्मेषाला अधिक गती देण्याची आवश्यकता आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून देशात उभारण्यात येणारा बल्क ड्रग पार्क औषधनिर्मिती क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या उपक्रमामुळे औषधनिर्मिती क्षेत्रातील क्षमता वाढविण्यास आणि उद्योगाच्या विकासाला चालना देण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

कोविड काळातील योगदानाचा गौरव

कोविड-१९ महामारीच्या काळात ॲस्ट्राझेनेकाने दिलेले योगदान भारत विसरणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. कंपनीच्या लसीवर आधारित कोविशिल्ड लसीमुळे देशातील नागरिकांना मोठा आधार मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या ‘लस मैत्री’ उपक्रमांतर्गत भारताने ९९ देशांना कोविड प्रतिबंधक लसींचा पुरवठा केला. या माध्यमातून ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भारतीय संस्कृतीची भावना जगासमोर मांडण्यात आली. या कार्यात ॲस्ट्राझेनेकाचे योगदान महत्त्वाचे होते, असे फडणवीस यांनी नमूद केले.

कर्करोगावरील उपचार अधिक प्रभावी करण्यावर भर

औषधनिर्मितीबरोबरच वैद्यकीय तंत्रज्ञान आणि निदान पद्धतींमधील नव्या संशोधनामुळे आरोग्यसेवेत मोठे बदल घडत आहेत. कर्करोगासारख्या गंभीर आजारांवरील उपचार अधिक प्रभावी करणे आणि या आजारांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.



अचूक निदान, रुग्णाच्या गरजेनुसार उपचार आणि आधुनिक औषधांचा वापर यांमुळे आरोग्यसेवेचा दर्जा उंचावता येईल. प्रत्येक नागरिकाला परवडणाऱ्या दरात दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी संशोधन आणि नवोन्मेष महत्त्वाचे आहेत. औषधनिर्मिती कंपन्यांनी या दिशेने अधिक प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यापीठे आणि संशोधन संस्थांसोबत सहकार्याचे आवाहन

महाराष्ट्रात जागतिक दर्जाची विद्यापीठे आणि संशोधन संस्था कार्यरत आहेत. ॲस्ट्राझेनेकाने या संस्थांसोबत सहकार्य वाढवावे, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. अशा भागीदारीमुळे औषध संशोधनाला संस्थात्मक बळ मिळेल आणि तरुण संशोधकांच्या प्रतिभेचा उपयोग नव्या औषधांच्या विकासासाठी करता येईल.

मुंबईतील नव्या मुख्यालयाच्या माध्यमातून कंपनीने संशोधन, औषधनिर्मिती आणि आरोग्यसेवेच्या विविध क्षेत्रांत विस्तार करावा. उद्योगांची वाढ राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाशी जोडलेली असल्याने कंपन्यांना आवश्यक सहकार्य देण्यास महाराष्ट्र शासन तयार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘विकसित भारत’च्या उद्दिष्टाशी कंपनीची बांधिलकी

ॲस्ट्राझेनेका फार्मा इंडिया लिमिटेडचे भारतातील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रवीण राव अक्किनेपल्ली यांनी प्रास्ताविकात कंपनीच्या मुंबईतील नव्या मुख्यालयाची भूमिका स्पष्ट केली. भारताच्या ‘विकसित भारत’ आणि महाराष्ट्राच्या ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनांशी कंपनीची उद्दिष्टे सुसंगत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताला नवोन्मेषाधारित अर्थव्यवस्था बनविण्यासाठी औषधनिर्मिती आणि जैवऔषध क्षेत्रातील संशोधनाला चालना देणे आवश्यक आहे. विज्ञानाच्या माध्यमातून रुग्णांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कर्करोगावरील उपचारांबरोबरच श्वसनविकार, जैवऔषधे आणि दुर्मिळ आजारांवरील उपचारांच्या क्षेत्रातही कंपनी संशोधन करत आहे. महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी कंपनी प्रयत्नशील राहील, असे अक्किनेपल्ली यांनी सांगितले.

Fadnavis’s major message regarding effective treatment for serious illnesses, including cancer; what exactly is the plan?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात