विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील ताडदेव परिसरात मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना घर न देण्याबाबतची रिअल इस्टेट जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. रिअल इस्टेट एजंट भावेश कावरे यांनी इन्स्टाग्रामवर ही जाहिरात केल्याचे समोर आले आहे. ताडदेवमध्ये दोन बीएचके फ्लॅट उपलब्ध असल्याचे सांगताना, मात्र मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना हा फ्लॅट दिला जाणार नसल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले होते. या प्रकारावर विविध राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संबंधित ब्रोकरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर संजय घाडी यांनी या प्रकारावर आक्षेप घेतला. राज्य सरकार किंवा मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्याही कायद्यात व्यक्तीच्या आहाराच्या सवयीवरून तिला गृहनिर्माण संस्थेत किंवा इमारतीत सदनिका द्यावी अथवा देऊ नये, अशी तरतूद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संबंधित व्हिडीओ आपणही पाहिला असून, अशा प्रकारे मांसाहारी व्यक्तींना फ्लॅट न देण्याची जाहिरात करणाऱ्या एजंट किंवा बिल्डरविरोधात कारवाई केली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. एखाद्या व्यक्तीच्या खाण्याच्या सवयीवरून घर देण्यास नकार देणे हा भेदभाव असल्याचे त्यांनी म्हटले. कुटुंबातील एखादी व्यक्ती मांसाहार करत असेल, तर केवळ त्या कारणामुळे संपूर्ण कुटुंबाला घर नाकारणे योग्य नसल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.
मनसेचे मुंबई महानगरपालिकेतील गटनेते यशवंत किल्लेदार यांनी संबंधित ब्रोकरविरोधात आक्रमक भूमिका घेत, या प्रकाराचा मनसे स्टाईलने समाचार घेतला जाईल, असे म्हटले आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडूनही या जाहिरातीवर आक्षेप घेण्यात आला आहे.
या प्रकरणी मनसेचे मलबार हिल विभाग अध्यक्ष दिनेश फुंडे यांनी ताडदेव पोलीस ठाण्यात रिअल इस्टेट एजंट भावेश कावरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. विशिष्ट आहाराच्या सवयी असलेल्या लोकांनाच घर मिळेल, अशा प्रकारची जाहिरात करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीत भारतीय संविधानातील कलम 14, 15, 19 आणि 21 चा उल्लेख करण्यात आला असून, धार्मिक, जातीय तसेच आहाराच्या सवयींच्या आधारे भेदभाव केला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. अशा प्रकारामुळे समाजातील शांतता आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीविरोधात लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून चौकशी आणि कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे.
दरम्यान, या जाहिरातीवरून वाद वाढल्यानंतर भावेश कावरे यांनी माफी मागितल्याचे समोर आले आहे. मांसाहार करणाऱ्यांना ताडदेवमध्ये घर मिळणार नाही, असा दावा करणाऱ्या त्यांच्या व्हिडीओवर ठाकरे गट आणि मनसेकडून आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर कावरे यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे मुंबईतील घरभाडे आणि घरखरेदी व्यवहारांमध्ये आहाराच्या सवयींच्या आधारे होणाऱ्या कथित भेदभावाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App