पुणे पदवीधर निवडणुकीत महायुतीची एकजूट; स्मिता जाधवांसाठी शरद लाड, भैय्या माने मैदानात, फडणवीसांचा विश्वास

CM Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार स्मिता जाधव यांच्या समर्थनार्थ शरद लाड आणि भैय्या माने यांनी उमेदवारी मागे घेत पाठिंबा दिला आहे. दोघेही आपापल्या जिल्ह्यांत प्रचाराची जबाबदारी सांभाळत असून, महायुतीचे कार्यकर्ते अधिकृत उमेदवारांच्या विजयासाठी एकजुटीने काम करत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत महायुतीचे पाचही उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस बोलत होते. नागपूर आणि पुणे पदवीधर तसेच पुणे शिक्षक मतदारसंघांत भाजप निवडणूक लढवत आहे. या तिन्ही मतदारसंघांत भाजपचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार असून, त्याला विजयी करण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते प्रयत्न करतील. तर छत्रपती संभाजीनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला देण्यात आली असून, तेथेही महायुतीचे कार्यकर्ते एकत्रितपणे काम करतील, असे त्यांनी सांगितले. निवडणुकीसाठी सुरू असलेली तयारी समाधानकारक असल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले.



भाजपच्या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसह पश्चिम महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपच्या आमदारांची, पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांची, नगरसेवकांची आणि जिल्हा परिषद सदस्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.

निवडणुकीसाठी चांगली तयारी सुरू असून, प्रत्येकाने पूर्ण ताकदीने काम करावे आणि मतदानाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे मार्गदर्शन बैठकीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विजयासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

सचिन सानप यांच्या उमेदवारीवर फडणवीसांचे स्पष्टीकरण

पुणे पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्या उमेदवारीबाबतही फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. सानप हे महायुतीचे अधिकृत उमेदवार नसून, अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत एकूण ३९ उमेदवार रिंगणात असल्याचे त्यांनी सांगितले.

व्यक्तिगत संबंध असणे आणि पक्षाची अधिकृत भूमिका या दोन वेगळ्या बाबी आहेत. कोणाचे कोणाशी वैयक्तिक संबंध असले, तरी भाजप आणि महायुतीचे कार्यकर्ते अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सानप यांच्या उमेदवारीचा महायुतीच्या अधिकृत भूमिकेशी संबंध जोडता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

पाचही जागांवर विजयाचा विश्वास; प्रत्यक्ष निकालाकडे लक्ष

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत महायुतीने जागावाटपानुसार संबंधित पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात स्मिता जाधव यांच्यासाठी शरद लाड आणि भैय्या माने यांनी उमेदवारी मागे घेतल्याने भाजपच्या प्रचाराला पाठबळ मिळाल्याचे चित्र आहे.

जागावाटपानंतर काही मतदारसंघांत उमेदवारीवरून निर्माण झालेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर, अधिकृत उमेदवारांच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचा संदेश भाजपच्या बैठकीतून देण्यात आला. आता महायुतीची ही एकजूट प्रचारात आणि मतदानात कितपत प्रभावी ठरते, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Mahayuti Will Win All Five Seats’: CM Devendra Fadnavis Expresses Confidence

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात