विशेष प्रतिनिधी
धाराशिव : धाराशिवच्या राजकीय वर्तुळात भारतीय जनता पक्षातील (BJP) अंतर्गत घडामोडी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मल्हार पाटील यांच्या समर्थनार्थ झालेल्या बॅनरबाजीवरून पक्षांतर्गत नाराजी आणि कारवाईची चर्चा रंगली होती.
आता नव्या घडामोडीने या चर्चेला आणखी हवा मिळाली आहे. भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश इंगळगी यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या सोशल मीडिया पोस्टची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ‘आरंभ नव्या युगाचा, कधीही न संपणाऱ्या मल्हार पर्वाचा’ अशा आशयाची पोस्ट इंगळगी यांनी केल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी मल्हार पाटील यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केल्याने चर्चेत आलेल्या राहुल काकडे यांच्या जागी इंगळगी यांची नियुक्ती झाली आहे. या पोस्टसोबतच भाजपमधील काही नगरसेवक आणि तरुण पदाधिकाऱ्यांकडूनही मल्हार पाटील यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्या जात असल्याची चर्चा आहे.
त्यामुळे पक्षातील वरिष्ठांच्या भूमिकेनंतरही तरुण फळी मल्हार पाटील यांच्या समर्थनार्थ सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. ‘भावी खासदार’च्या बॅनरनंतर पुन्हा सोशल मीडिया ट्रेंड काही दिवसांपूर्वी राहुल काकडे यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांचा उल्लेख ‘भावी खासदार’ असा करत बॅनरबाजी केली होती. या बॅनरबाजीमुळे भाजपच्या स्थानिक राजकारणात मोठी चर्चा रंगली होती. या प्रकरणानंतर काकडे यांच्यावर पक्षाने कारवाई केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.
मात्र, राहुल काकडे यांनी हे आरोप फेटाळून लावत आपण वैयक्तिक कारणांमुळे पदाचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले होते. तसेच भविष्यात पक्षाकडून आपल्याला मोठी जबाबदारी मिळू शकते, असेही त्यांनी म्हटले होते. नव्या जिल्हाध्यक्षांच्या पोस्टने चर्चेला नवं वळण राहुल काकडे यांच्या राजीनाम्यानंतर गणेश इंगळगी यांची युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, आता इंगळगी यांच्याकडूनच मल्हार पाटील यांच्या समर्थनार्थ करण्यात आलेली पोस्ट चर्चेत आली आहे. त्यामुळे धाराशिव भाजपमध्ये मल्हार पाटील यांच्या राजकीय भवितव्याबाबत तरुण पदाधिकाऱ्यांची भूमिका नेमकी काय आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सोशल मीडियावर अचानक सक्रिय झालेला हा ‘मल्हार पर्व’ ट्रेंड आगामी काळातील भाजपच्या स्थानिक राजकारणासाठी काय संकेत देतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सोशल मीडियावरील या पोस्ट आणि समर्थनामागे पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, मल्हार पाटील यांच्या समर्थनार्थ सुरू झालेल्या सोशल मीडिया मोहिमेमुळे धाराशिव भाजपमधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App