शरद पवारांना राष्ट्रपती करणे विरोधकांना शक्य होईल? बाकीच्यांचे सोडून द्या, ते काँग्रेस आणि शिवसेनेला परवडेल?


नाशिक – निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत उतरविण्यासाठी राजकीय जुळवाजुळव सुरू केल्याची बातमी इंडिया टुडेने दिली आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर २०२२ मध्ये भाजप आणि एनडीए यांचा मुकाबला करणारे इलेक्ट्रोल कॉलेज उभे करता येऊ शकेल, असा प्रशांत किशोर यांचा होरा आहे. If Sharad Pawar becomes presidential candidate?; what will its political price for Shiv Sena and Congress in maharashtra??

पण त्यांच्या मनसूब्यात काँग्रेस सहभागी झाली तरच हे शक्य होऊ शकेल. त्यामुळे त्यांनी सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांची भेट घेऊन आपला मनसूबा त्यांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न केला आहे, असे इंडिया टुडेने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.

यातला इलेक्ट्रोल कॉलेजचा मुद्दा थोडा वेळ बाजूला ठेवला आणि शरद पवार हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत खरेच उतरले तर…?? याच प्रश्नाची राजकीय बाजू लक्षात घेतली तर दोन सवाल खडे होतात आणि ते दोन राजकीय पक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते पक्ष म्हणजे शिवसेना आणि खुद्द काँग्रेस. पवारांच्या राष्ट्रपतीपदाचा (जर ते उभे राहिले आणि निवडून आले तर) प्रभाव सगळ्या देशावर पडेल. पण त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या फक्त उमेदवारीचा प्रभाव मात्र शिवसेना आणि काँग्रेस यांच्यावर पडेल, हे मुद्दे येथे लक्षात घेतले पाहिजेत.

काँग्रेसवर प्रभाव

शरद पवार आज फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. तर त्यांचा मोठा राजकीय उपद्रव महाराष्ट्रात काँग्रेसला सहन करावा लागते आहे. महाराष्ट्रात त्यांचे उपद्रवमूल्य किती आहे हे इथल्या काँग्रेसजनांना चांगलेच माहिती आहे. पवार राष्ट्रपतीपदाचे नुसते उमेदवार झाले तरी त्यांची महाराष्ट्रात एखाद्या हिरोची प्रतिमा तयार करायच्या कामाला मराठी माध्यमे लागतील आणि त्याचा जो फटका भाजपला विरोधी पक्ष म्हणून बसायचा तो बसेलच. पण संघटनात्मक पातळीवर तो काँग्रेसला सर्वाधिक बसण्याची शक्यता आहे. कारण त्यातून राष्ट्रवादी आपली ताकद वाढविण्यासाठी काँग्रेसच पोखरून काढेल. काँग्रेसजनांचा पक्षांतराचा नॅचरल चॉइस देखील राष्ट्रवादीच राहिला आहे, हे लक्षात घेतले तर हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आमदारांच्या संख्येचे अंतर आता १० चे आहे. तर काँग्रेसला ठाकरे – पवारांनी सत्तेमध्ये तिय्यम स्थान दिले आहे. राष्ट्रपतीपदाच्या नुसत्या उमेदवारीने तयार होणाऱ्या वातावरण निर्मितीत राष्ट्रवादीची ताकद वाढली, तर ती कोणत्या पक्षाच्या सर्वाधिक मूळावर येणार आहे…?? काँग्रेसच्याच ना…!! म्हणजेच पवारांची राष्ट्रपतीपदाची उमेदवारी महाराष्ट्रात काँग्रेसला अजिबात परवडणारी नाही. (यामध्ये अद्याप सोनिया गांधी – राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यातील राजकीय नात्याचा विचार केलेला नाही. तो स्वतंत्र विषय आहे. आणि तोच निर्णायक आहे. इथे प्रशांत किशोर यांची रणनीती किती उपयोगी पडते हे पाहणे रंजक ठरेल.)



-शिवसेनेवर प्रभाव

पवारांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीचा प्रभाव शिवसेनेवर संघटना म्हणून पडेलच. पण त्याचबरोबर त्यांची राजकीय गोची त्यांच्या मराठी माणूस पंतप्रधान किंवा राष्ट्रपती या भूमिकेमुळे होईल. राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेने मराठी माणूस म्हणून प्रतिभा पाटलांना पाठिंबा दिला होता. पण तसा पाठिंबा प्रतिभा पाटलांना देणे निराळे आणि शरद पवारांना देणे निराळे. प्रतिभा पाटलांना दिलेल्या पाठिंब्यामुळे शिवसेनेला राजकीय किंमत मोजावी लागणार नव्हती.

पवारांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा देणे हा शिवसेनेसाठी मोठी राजकीय किंमत चुकविण्याचा विषय ठरेल. कारण पवारांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीचा सगळ्यात मोठा लाभार्थी राष्ट्रवादीच ठरेल. पवारांच्या उमेदवारीमुळे महाराष्ट्रात जी वातावरण निर्मिती करण्यात येईल, त्याचा फायदा राष्ट्रवादी स्वतःसाठी नंबर एकचा पक्ष म्हणून प्रस्थापित करण्यासाठी घेईल.

आज शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या आमदारांच्या संख्येत फक्त दोनचा फरक आहे. ५६ आणि ५४. (त्यात भालके पंढरपूरातून हरले म्हणून राष्ट्रवादीचे आमदार झालेत ५३.) आमदारांच्या संख्येतला फरक राष्ट्रवादीने भरून काढणे हे शिवसेनेसाठी सर्वांत घातक ठरणारी बाब आहे. कारण त्यांचा मुख्यमंत्रीपदावरचा हक्कच या निमित्ताने राष्ट्रवादी काढून घेईल. आणि एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदावरचा हक्क काढून घेतला की पुढचे काम अधिक सोपे होईल. तेव्हा शिवसेना काय करेल…?? कोणत्या आधारावर ते राष्ट्रवादीशी राजकीय समझोता करण्याच्या स्थितीत राहतील…?? काँग्रेसने सत्तेमध्ये तिय्यम स्थान सहन केले आहे. शिवसेनेला ते सहन करता येईल…?? हे प्रश्न पवारांच्या नुसत्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीने निर्माण होणारे आहेत. शिवसेनेला याबाबत भावनिक नव्हे, तर राजकीय व्यवहार पाहून निर्णय करावा लागेल.

शरद पवार हे राष्ट्रपती होतील की नाही माहिती नाही. पण त्यांच्या नुसत्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीने महाराष्ट्रात जी राजकीय वातावरण निर्मिती होईल, त्याची ही नुसती झलक वर मांडली आहे. काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासाठी त्याचे परिणाम यापेक्षा जास्त व्यापक आणि खोल असतील.

If Sharad Pawar becomes presidential candidate?; what will its political price for Shiv Sena and Congress in maharashtra??

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात