वृत्तसंस्था
पाटणा : TET पेपरफुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांना मोठे यश मिळाले असून या रॅकेटचा मुख्य सूत्रधार बिजेंद्र कुमार गुप्ता याला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीचा गुप्त माहिती आणि विविध राज्यांच्या पोलिसांच्या समन्वयातून शोध घेण्यात आला. अटकेनंतर त्याला भिवंडीत आणण्यात येत असून न्यायालयात हजर केले जाणार आहे.
छापखान्यातूनच पेपर बाहेर काढल्याचा आरोप
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बिजेंद्र गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी छापखान्यातील कर्मचाऱ्यांना पैशांचे आणि मालमत्तेचे आमिष दाखवून प्रश्नपत्रिका मिळवल्या. पेपर बुटामध्ये लपवून छापखान्याबाहेर आणण्यात आल्याचा आरोप आहे. अवघ्या ८ हजार रुपयांत मिळवलेल्या प्रश्नपत्रिका महाराष्ट्रात तब्बल दीड कोटी रुपयांना विकण्याचा कट रचण्यात आला होता.
भिवंडी पोलिसांनी ग्राहक बनून उधळला डाव
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर भिवंडी पोलिसांनी गुप्त कारवाई सुरू केली. पोलिसांनी बनावट ग्राहक बनून आरोपींशी संपर्क साधला आणि कोंगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये सापळा रचला. पेपर विक्रीचा व्यवहार सुरू असतानाच आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत यापूर्वी १२ आरोपींना अटक झाली होती. आता मुख्य सूत्रधारालाही अटक झाल्याने तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.
अनेक राज्यांत गुन्हे, तरीही सतत फरार
पोलिसांच्या तपासात बिजेंद्र गुप्ता याच्यावर यापूर्वीही विविध राज्यांतील पेपरफुटी प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. एका हत्या प्रकरणातही त्याला अटक झाली होती. प्रत्येकवेळी जामिनावर सुटल्यानंतर तो ओळख बदलून दुसऱ्या राज्यात कार्यरत होत असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. आता या अटकेनंतर देशभरातील पेपरफुटी रॅकेटचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App