विशेष प्रतिनिधी
मुंबई : एका वृद्ध नेत्याने दिला पोक्त सल्ला, तर दुसऱ्याने भाषणात काढल्या बेटकुळ्या!!, असे काल INDI आघाडीत घडले. P. Chidambaram gave politically mature advice to Congress and INDI alliance, but sharad pawar gave babble speech in pune district!!
काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी काँग्रेस आणि INDI आघाडीतल्या नेत्यांना काल एक पोक्त सल्ला दिला. तुम्ही भाजपची लढण्याची जिद्द नीट ओळखा आणि त्यानुसार INDI आघाडीची स्ट्रॅटेजी आखा, हा तो सल्ला आहे, तर कालच शरद पवारांनी पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात मी म्हातारा झालो नाही. भल्याभल्यांना “सरळ” करण्याची ताकद माझ्यात आहे, अशा भाषणातल्या बेटकुळ्या काढल्या.
पी. चिदंबरम 78 वर्षांचे आहेत. केंद्रात वर्षानुवर्षे ते अर्थमंत्री आणि त्यानंतर गृहमंत्री राहिले होते, तर शरद पवार नुकतेच 84 वर्षांचे झाले आहेत आणि केंद्रात अडीच वर्षांचे संरक्षण मंत्री पद आणि 10 वर्षांचे कृषिमंत्री पद हा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. पण या दोन्ही नेत्यांच्या राजकीय प्रगल्भतेत मूलभूत फरक आहे.
चिदंबरम यांनी दिलेला सल्ला केवळ काँग्रेससाठी नाही, तर संपूर्ण INDI आघाडीतल्या सर्व नेत्यांना लागू आहे आणि तो “सावध ऐका पुढल्या हाका”, एवढा गंभीर इशारा देणार आहे.
पी. चिदंबरम यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसच्या आणि INDI आघाडीतल्या उणीवा स्पष्टपणे सांगितल्या. भाजपला हरवायचे असेल, तर INDI आघाडीला लोकसभेच्या 400 ते 450 जागांवर गंभीरपणे विचार करून एकास एक उमेदवार दिला पाहिजे. INDI आघाडीने एकजिनसीपणाने लढले पाहिजे. कारण भाजप प्रत्येक निवडणुकीत शेवटची असल्यासारखी लढवतो. भाजपची निवडणुका लढवण्याची जिद्द काँग्रेस आणि INDI आघाडीतल्या नेत्यांनी नीट ओळखली पाहिजे आणि त्यानुसार स्ट्रॅटेजी आखली पाहिजे, असा सल्ला चिदंबरम यांनी दिला.
त्याचवेळी त्यांनी अत्यंत गंभीरपणे बेरोजगारी आणि महागाईचे मुद्दे उचलले तर काँग्रेस आणि INDI आघाडीला निश्चित लोकांचा प्रतिसाद मिळू शकतो याचेही भान नेत्यांना आणून दिले. वर्षानुवर्षे काँग्रेसच्या सत्ता वर्तुळात वावरणाऱ्या चिदंबरम यांचा हा अनुभवी पोक्त सल्ला आहे.
पवारांची दमबाजी, पण कुणाला??
त्या उलट शरद पवारांनी स्वतःच्याच पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात आपण भल्याभल्यांना “सरळ” करण्याची ताकद राखतो, अशी दमबाजी केली. पण ही दमबाजी नेमकी कुणाला होती??, याचा नीट विचार केला, तर ती आपल्याच अनुयायांना होती, असे त्यातून दिसून आले.
शरद पवारांना वयाच्या 84 व्या वर्षी देखील ते वृद्ध झाल्याचे मान्य नाही. हरकत नाही. हा त्यांचा वैयक्तिक विषय असू शकतो. पण ते ज्यावेळी “भल्याभल्यांना” “सरळ” करण्याची आपली ताकद आहे, अशी दमबाजी करतात तेव्हा त्यांनी कोणकोणत्या “भल्याभल्यांना” “सरळ” केले आहे?? किंवा कोणकोणत्या “भल्याभल्यां”कडून ते स्वतःच “सरळ” झालेत??, याचा जरा ऐतिहासिक आढावा घेतला तर वेगळीच वस्तुस्थिती समोर येते.
शरद पवारांच्याच सांगण्यानुसार 1980 मध्ये त्यांच्याबरोबर असलेले 50 आमदार काँग्रेसमध्ये निघून गेले आणि 4 – 5 आमदार त्यांच्याबरोबर उरले होते. त्यापैकी 50 च्या 50 लोक निवडणुकीत पडले आणि तेवढेच नवे लोक निवडून आले. मग पवारांबरोबर आधी असलेले आणि नंतर निवडणुकीत पडलेले लोक “भलेभले” होते असे त्यांना म्हणायचे आहे का?? असा सवाल आहे.
पवारांनाच दिल्लीने “सरळ” केले
शिवाय पवारांच्या म्हणण्यानुसार गेल्या 55 – 60 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक “भल्याभल्यांना” “सरळ” केले, पण ते “भलेभले” दिल्लीतले होते की फक्त महाराष्ट्रातले होते??, याचाही विचार करायला नको का?? पवारांची दिल्लीतली कारकीर्द कोणत्या “भल्याभल्यांना” “सरळ” करण्यात गेली की दिल्लीतल्याच “भल्याभल्यांनी” पवारांना “सरळ” करून परत मुंबईत पाठवले, हे जरा नीट तपासले, तर पवारांची “भल्याभल्यांना” “सरळ” करण्याची खरी ताकद किती तोकडी आहे, समजून येईल. पवार खरंतर 1991 मध्ये दिल्लीत “भल्याभल्यांना” “सरळ” करायला गेलेच होते. पण नरसिंह राव, सीताराम केसरी आणि सोनिया गांधी या “भल्याभल्या” नेत्यांनी पवारांनाच “सरळ” करून दिल्लीतून मुंबईत पाठवून दिले होते. राव, केसरी आणि सोनिया या “भल्याभल्यांना” पवारांना “सरळ” करता आलेच नाही, उलट त्यांच्याकडून “सरळ” होऊन महाराष्ट्रात परतावे लागले, हा नजीकच्या काळातलाच इतिहास आणि वर्तमान आहे.
शिवाय पवारांची महाराष्ट्रात राहून किंवा पुणे जिल्ह्यात सार्वजनिक भाषणांमधून दिल्लीतल्या नेत्यांना किंवा अगदी पाकिस्तानलाही दमबाजी करण्याची सवय जुनी आहे. संरक्षण मंत्री असताना त्यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या एका कार्यक्रमातून पाकिस्तानला दम भरला होता. त्या दमाची भाजपचे नेते प्रमोद महाजन यांनी अनेकदा खिल्लीही उडवली होती.
तशीच दमबाजी पवारांनी काल पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात साहेब केसरी नावाच्या बैलगाड्या शर्यतीच्या कार्यक्रमात केली. “भल्याभल्यांना” “सरळ” करण्याची ताकद आपल्याकडे आहे, असे ते म्हणाले पण हे “भलेभले” म्हणजे आपल्याच पुतण्याचे अनुयायी आमदार असल्याचे त्यांनी चतुराईने लपविले.
काँग्रेस संस्कृतीतल्या रुजलेल्या दोन वृद्ध नेत्यांची ही राजकीय कहाणी आहे. एकाने वयाच्या 78 व्या वर्षी काँग्रेस आणि INDI आघाडीतल्या नेत्यांना पोक्त सल्ला दिला, तर दुसऱ्याने आपल्याच जिल्ह्यातल्या एका तालुक्यात बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमात भाषणातून बेटकुळ्या काढल्या!!… हे दोन्ही नेते, ज्या INDI आघाडीत आहेत, ती आघाडी म्हणे, मोदींना “टक्कर” देणार आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App