बारामतीतल्या संभाव्य पराभवाची काका – पुतण्यांना एवढी भीती का वाटतेय?? बारामतीत कोणत्याही पवारांचा पराभव झाला, तर असे कोणते आकाश कोसळणार आहे?? किंवा बारामतीत एकदा पराभव झाला, तर पुन्हा उसळी मारून राजकारण फिरवण्याची दोन्ही पवारांमध्ये क्षमताच उरणार नाही का??, असे एकापाठोपाठ एक सवाल बारामती लोकसभा निवडणुकीतल्या नणंद – भावजयीच्या लढतीमुळे मुळे तयार झाले आहेत.
वास्तविक कुठल्याही नेत्याचा एखाद्या मतदारसंघात पराभव होऊन त्याची राजकीय कारकीर्द संपते, असे अजिबात नाही, पण पवार काका – पुतण्यांना बारामतीतला संभाव्य पराभव एवढा डांचतो आहे, की जणू काही आपली राजकीय कारकीर्द कायमचीच संपुष्टात येणार आहे किंवा आपले बारामतीच्या इतिहासातले नावच पुसले जाणार आहे, ही भीती दोन्ही पवारांना वाटते आहे!!
खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत पवारांपेक्षा राजकीय कर्तृत्वात आणि बुद्धिमत्तेत कितीतरी पटींनी मोठे असणाऱ्या अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. पण त्यांना पराभवाची फारशी कधी भीती वाटली नाही किंवा त्यांनी त्या पराभवाची फिकीर केली नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर, आणीबाणी नंतर 1977 च्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव झाला होता. तो पराभव झाल्याबरोबर “इंदिरा गांधी संपल्या”, “आता त्या पुन्हा कधी सत्तेवर येणार नाहीत”, वगैरे बाता त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांनी भरपूर मारल्या होत्या. त्यातून इंदिरांचा आत्मविश्वास खचला होता, पण तो फारच थोड्या काळासाठी. 1980 च्या निवडणुकीत इंदिरा गांधींनी असा काही झपाटा मारला, की त्या अक्षरशः फिनिक्स भरारी घेऊन पुन्हा सत्तारूढ झाल्या. त्यावेळी पवारांच्या राजकीय गुरूंची सुद्धा इंदिराजींनी राजकीय ससेहोलपट केली होती.
इंदिराजींनी मोठ्या हिंमतीने 1977 चा पराभव पचवला होता. त्यावर अवघ्या 3 वर्षांमध्ये मातही केली होती. मग बारामती सारख्या एखाद्या मतदारसंघात एखादा पराभव झाला तर तो पचवण्याची पवार – काका पुतण्यांमध्ये क्षमताच नाहीये का?? की आणखी अशी काय “रहस्ये” बारामतीतल्या संभाव्य पराभवात दडली आहेत, की ज्याची पवारांना खरी भीती वाटते आहे??
पवार काका – पुतणे आत्तापर्यंत बारामतीत कधीच हरले नाहीत. हे रेकॉर्ड आहे. पण पवार नावाचे उमेदवार कुठल्याच निवडणुकीत कधीच हरले नाहीत, असे बिलकुल रेकॉर्ड नाही. उलट स्वतः शरद पवार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जगमोहन दालमिया यांच्याकडून फक्त एका मताने पराभूत झाले होते, तर मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ नावाच्या पवारांचा 2019 च्या निवडणुकीमध्ये पराभव झाला होता. त्यामुळे “पवार म्हणजे फक्त विजय आणि विजयच, पराभव कधीच नाही” हे समीकरण खोटे आहे. दोन निवडणुकांमध्ये पवारांचा पराभव झाल्याचा खरा इतिहास आहे.
मग त्या पराभवांमुळे पवारांची खऱ्या अर्थाने राजकीय कारकीर्द संपली का??, तर त्याचे उत्तर नकारार्थी आहे. बीसीसीआयच्या निवडणुकीतल्या पराभवामुळे ना शरद पवारांची कारकीर्द संपली, मावळ मधल्या पराभवामुळे ना पार्थ पवारची कारकीर्द संपली!! मग बारामतीतल्या कुठल्याही पवारांच्या एका पराभवामुळे असे कोणते आकाश कोसळणार आहे??, की पवारांना त्या संभाव्य पराभवाची एवढी भीती वाटावी??, हा कळीचा सवाल आहे.
… की कुठल्याही पवारांचा बारामतीत पराभव झाला तर पवारांनी आत्तापर्यंत झाकून ठेवलेली बारामतीतील काही “वेगळीच रहस्ये” बाहेर येणार आहेत, ज्यामुळे दोन्ही पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा इतिहासच पूर्ण बदलून जाणार आहे, याची भीती पवारांना वाटते आहे??
– किंमत तर चुकवावीच लागणार
बारामतीत सुनेत्रा पवारांचा पराभव झाला, तर त्याची राजकीय किंमत अजित पवारांना चुकवावी लागेल आणि ती फारच मोठी असेल, यात शंका नाही. कारण गाठ दुबळ्या काँग्रेसशी नाही, तर मोदींच्या भाजपशी आहे. पण बारामती सुप्रिया सुळे यांचा पराभव झाला, तर शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीला फार मोठा बट्टा लागेल, अशी बिलकुल स्थिती नाही. कारण स्वतः पवार त्यामुळे पराभूत झाले, असा तर इतिहास लिहिला जाणार नाही. त्यांची कन्या सुप्रिया सुळे पराभूत झाली एवढाच इतिहास लिहिला जाईल. पण तेवढा सुद्धा पराभवाचा संभाव्य इतिहास शरद पवारांना डांचतो आहे. कारण “पवार म्हणजे चाणक्य”, “पवार म्हणजे बारामती”, “पवार म्हणतील ती पूर्व” ही पवारांची पवारनिष्ठ मराठी माध्यमांनी तयार केलेली प्रतिमा कोसळणार आहे.
पण पवारांची “चाणक्य” प्रतिमाच आता पवारांची मानसिक राजकीय धारणा बनली असल्याने त्यांना सत्य दिसत नाही. शरद पवारांची ही धारणाच मूळातच लोकशाही प्रवृत्ती आणि प्रकृतीच्या विरोधात आहे. पवार कायम तोंडी लोकशाहीची भाषा बोलत असतात. अगदी मोदी हुकूमशहा आहेत. मोदी हे रशियाच्या पुतिन सारखेच आहेत, अशी टीका करत असतात. पण खुद्द पवार हे बारामतीच्या पुतिनशिवाय दुसरे कोण आहेत??, हा सवाल विचारला, तर मात्र पवारांना राग येणार आहे. कारण पुतिनने रशियावर सत्तेचा पंजा घट्ट आवळला आहे, तसाच तर पवारांनी बारामतीवर आपल्या सत्तेचा पंजा घट्ट आवळला आहे. मग तो पंजा कायमचा सैल पडण्याची भीती पवारांना वाटते आहे.
– फिनिक्स नसल्याची पवारांना जाणीव
म्हणूनच पवार एकमेकांविरोधात बारामतीत लढत आहेत. जिंकून आला तरी कुठलाही पवारच असेल आणि पडला तरी कुठलाही पवारच असेल, हे पवारांना माहिती आहे. पण तरीदेखील पवारांना बारामतीतल्या पराभवाची भीती डांचते आहे. कारण एकदा का बारामतीत पराभव झाला, तर आपण काही इंदिरा गांधी नाही, फिनिक्स पक्षासारखी भरारी घेण्याची आपली क्षमता नाही, याची पवारांना खात्री आहे आणि आपल्या पुढच्या पिढीत आपल्या जवळपासही येणारे नेतृत्व शिल्लक नाही, याची पवारांना जाणीव आहे.
अशा स्थितीत बारामतीच्या निमित्ताने मराठी माध्यमांवर भरपूर खर्च करून आपणच निर्माण केलेला स्वतःचा “चाणक्य” नावाचा डोलारा धाडकन कोसळण्याची भीती पवारांना वाटते आहे. बारामतीच्या पराभवातून एकदा तो “चाणक्य” नावाचा डोलारा कोसळला की, आपण उभे केलेले “पांढरे – काळे साम्राज्य” कोसळायला वेळ लागणार नाही आणि ते कोसळले की पुन्हा कधीही सावरता आणि उभारता येणार नाही, हे पवारांना माहिती आहे. बारामती कायमची गमावण्यातला हा खरा धोका पवारांना कळला आहे आणि म्हणूनच कुठल्याही पवारांना बारामतीतल्या पराभवाची भीती मुळापासून डांचते आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App