विशेष प्रतिनिधी
मुंबई : पॅरिस ऑलिंपिक मधून महाराष्ट्रासाठी खूषखबर आली. 1952 च्या हेलसिंकी ऑलिंपिक मध्ये खाशाबा जाधवांनी महाराष्ट्राला कुस्ती मध्ये ऑलिंपिक पदक मिळवून दिले होते. त्यानंतर 2024 च्या पॅरिस ऑलिंपिक मध्ये कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे याने 50 मीटर रायफल शूटिंगमध्ये महाराष्ट्राला ऑलिंपिक पदक मिळवून दिले.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला तिसरे पदक मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी संवाद साधला. त्यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलला बक्षीस जाहीर केले. स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्वप्नीलच्या प्रशिक्षकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले. त्याआधी स्वप्नीलच्या वडिलांशी एकनाथ शिंदेंनी फोनवरून संपर्क साधून त्यांचं देखील अभिनंदन केलं होतं. टीम इंडियाच्या 4 खेळाडूंना 1 कोटीचं बक्षिस जाहीर करणाऱ्या राज्य सरकारने स्वप्निल कुसाळेला किती बक्षिस दिलं? पाहा
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
स्वप्निलचं रौप्यपदकस 0.1 ने हुकलंय. त्याची कामगिरी खूप चांगली झाली. महाराष्ट्राचं नावलौकिक झालंय. त्याच्या आईवडिलांचं अभिनंदन… स्वप्निल तू 13 कोटी जनतेचं नाव गाजवलं आहे. महाराष्ट्र सरकारकडून आपण 1 कोटी रुपयांचं बक्षिस जाहीर करत आहोत, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील नेमबाजी खेळातील पुरुष ५० मी.रायफल थ्री पोझिशन विभागात स्वप्नील कुसाळे या कोल्हापूरच्या नेमबाजाने कांस्य पदकावर मोहोर उमटवून संपादन केलेल्या उत्तुंग यशामुळे देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. जागतिक क्रीडाविश्वाच्या नकाशावर देशाचे स्थान अधोरेखित करणारा स्वप्नील हा महाराष्ट्राचा सुपुत्र आहे ही बाब महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे, असे एकनाथ शिंदेंनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी खाशाबा जाधवांनंतर स्वप्नीलने महाराष्ट्राला ऑलिंपिक पदक मिळवून दिल्याबद्दल कुसाळे परिवाराशी संवाद साधून अभिनंदन केले.
दरम्यान, पुरुष 50 मीटर रायफल थ्री पोझिशन गटात नेमबाजीमध्ये कांस्य पदक मिळवणाऱ्या स्वप्निलच्या जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाला सलाम, असं अजित पवार म्हणाले आहेत. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा २०२४ मध्ये कांस्य पदक मिळवून महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं नाव उंचावल्याबद्दल स्वप्निल कुसळे याचं मन:पूर्वक अभिनंदन, असंही अजित पवार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…
स्वप्निल कुसाळेचं खुप खुप अभिनंदन.. स्वप्निलची कामगिरी विशेष आहे कारण त्याने उत्तम लवचिकता आणि कौशल्य दाखवलं आहे. तसेच या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. प्रत्येक भारतीय आनंदी आहे, अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App