विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. अजितदादांच्या मंत्र्यांविरोधात तगडी व्यूहरचना करून विधानसभा निवडणुकीत शरद पवार 20 युवकांना संधी देणार असल्याची सूत्रांनी माहिती दिल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. पण तरुणांच्या गळ्यात तुतारीच्या उमेदवारीची माळ घालण्याखेरीज पवारांकडे दुसरा पर्याय आहे काय??, याविषयी सूत्रांनी काही सांगितले नाही. त्यामुळे मराठी माध्यमांनी तशा बातम्या दिल्या नाहीत.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दिग्गजांविरोधात शरद पवार 20 तरुण चेहरे मैदानात उतरतील अशी शक्यता आहे. शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीआधी अजित पवारांच्या आमदारांविरोधात दंड थोपटल्याचं दिसत आहे. बारामती, अणुशक्ती नगर, दिंडोरी, श्रीवर्धन, परळी, कागल ते आंबेगाव अशा 20 मतदारसंघात नवीन चेहरे दिसणार आहेत, असे माध्यमांनी बातम्यांमध्ये नमूद केले आहे.
पवारांचे तरुण उमेदवार कुठून लढणार?
1. अहेरी : आमदार धर्मारावबाबा आत्राम 2. आष्टी : आमदार बाळासाहेब आसबे 3. दिंडोरी : आमदार नरहरी झिरवळ 4. गेवराई : भाजपचा आमदार आहे 5. श्रीवर्धन : आमदार अदिती तटकरे 6. हडपसर : आमदार चेतन तुपे 7. पुसद : आमदार इंद्रनील नाईक 8. बारामती : आमदार अजित पवार 9. अळमनेर : आमदार अनिल पाटील 10. उदगीर (अ.जा.) : आमदार संजय बनसोडे 11. इंदापूर : आमदार दत्तात्रय भरणे 12. अणुशक्ती नगर : आमदार नवाब मलिक 13. परळी : आमदार धनजंय मुंडे 14. कागल : आमदार हसन मुश्रीफ 15. आंबेगाव : आमदार दिलीप वळसे पाटील 16. मावळ : आमदार सुनील शेळके 17. सिन्नर : आमदार माणिकराव कोकाटे 18. तुमसर : आमदार राजू कोरमोरे 19. फलटण (अ.जा) : आमदार दीपक चव्हाण 20. वडगाव शेरी : आमदार सुनील टिंगरे
या सर्व विद्यमान आमदारांच्या विरोधात शरद पवार तुतारीच्या उमेदवारीची माळ तरुणांच्या गळ्यात घालणार असल्याचे मराठी माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने बातमीत नमूद केले आहे.
पण मूळात वर उल्लेख केलेले सर्व आमदार अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महायुतीच्या सत्तेच्या वळचणीला आले आहेत. त्यांना महायुतीतूनच उमेदवारी हवी आहे. त्यामुळे तसेही ते पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार म्हणून उपलब्धच नाहीत. अशा स्थितीत पवारांना या आमदारांच्या विरोधात तरुण उमेदवार शोधावे लागणार नाहीत, तर दुसरे काय करावे लागेल?? त्यांच्याकडे दुसरा पर्याय तरी आहे का??, या विषयी सूत्रांनी काही सांगितले नाही म्हणून मराठी माध्यमांनी त्याच्या बातम्या दिल्या नाहीत!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App