महात्मा गांधी यांना आदर्श मानणाऱ्या कॉंग्रेसला प्रत्यक्ष व्यवहारात मात्र गांधीजींच्या तत्त्वांवर चालता येत नाही हे अनेकवार सिद्ध झाले आहे. उद्धव ठाकरे-अजित पवार यांच्या सरकारमधील मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पंडित नेहरु यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला चंद्रपुरातली दारुबंदी हटवल्यानंतर त्यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्यांनी टीकेची झोड उठवली आहे. Social activist Vishwambhar Chaudhary criticises Congress leader, Minister Vijay Wadettiwar, issue of withdrawal of ‘Darubandi’ in Chandrapur
विशेष प्रतिनिधी
पुणे : ठाकरे-पवार सरकारमधील कॉंग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात लागू असणारी दारुबंदी उठवण्याचा निर्णय नुकताच घेतला. यावरुन वडेट्टीवार यांनी दारूच्या लॉबीला दिलेल्या वचनाची पूर्तता केली असावी, असा टोला सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी लगावला आहे.
सोशल मीडियात व्यक्त होताना चौधरी यांनी लिहिलं आहे, “विजय वडेट्टीवारांनी करून दाखवलं ! चंद्रपुरातली दारूबंदी उठवून त्यांनी दारूच्या लाॅबीला दिलेल्या वचनाची पूर्तता केली असावी. डाॅ. अभय बंग, पारोमिता गोस्वामी यांच्या सारख्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष लढा देऊन जे कमावलं होतं ते वडेट्टीवारांनी एका कागदाच्या फटक्यात नेस्तनाबूत केलं.अभिनंदन.”
“मंत्री महोदय.
हेच ते गुण आहेत ज्यामुळे देशात काॅग्रेस कधीही कुठेही डोकं सुद्धा वर काढण्याच्या स्थितीत नाही.
काॅग्रेस का हाथ
दारूवालों के साथ!
मत मागतांना लोकांकडे मागायचं आणि नोकरी वेगळ्याच लाॅबीची करायची – काॅग्रेस लोकांच्या मनातून का उतरली त्याचं एक कारण.
अहो वडेट्टीवार, पंडित नेहरूंच्या पुण्यतिथीचा मुहूर्त तरी टाळायचा होतात. तुम्हाला पंडित नेहरू कोण होते ते माहित आहे ना?,” असाही खोचक प्रश्न चौधरी यांनी वडेट्टीवार यांना विचारला आहे.
वडेट्टीवार यांच्या निर्णयावरुन उपस्थित केलेल्या चर्चेत चौधरी म्हणतात की, बंदी करावी असा फॅसिझम कोणीच करत नाही. प्रश्न रॅशनल किंवा सारासारविवेकाचा आहे. राज्याचं धोरण काय हा आहे. या राज्यानंच एक धोरण ठरवलं की स्थानिक स्त्रियांनी बहुमतानं ठरवलं तर दारूबंदी होईल. ‘उभी बाटली की आडवी बाटली’ यासाठी बाकायदा मतदान होऊन बहुमताच्या आधारे दारूबंदी केली असेल तर ती दारूबंदी उठवतांना मतदान घेणं आवश्यक नाही का? गरीब बाया बापड्या कष्ट करून, संघटन करून बंदी मिळवतात ती दारूचे व्यावसायिक कोणतंही मतदान न घेता सरकारला विकत घेऊन एका रात्रीतून उठवून लावत असतील तर सरकार कोणाच्या बाजूने आहे तो संदेश जातोच. एकतर ते धोरण रद्द केलं म्हणून सांगा किंवा ते पाळा.
“मविआ सरकार कोणाच्या बाजूनं? लोकशाहीच्या की दारू लाॅबीच्या हा खरा प्रश्न आहे,” असा प्रश्न चौधरी यांनी विचारला आहे. ‘बंदी घातली की काळा बाजार वाढतो’ हा युक्तिवाद मान्य करायचा असेल तर राज्य सरकारनं अफू आणि गांजाच्या पिकावरची बंदी उठवावी. शेतकऱ्यांना अफू, गांजा पिकवून उत्पन्न वाढवू द्यावे. बंदी म्हणजे काळाबाजार हे गोंडस तत्व दारूच्या लाॅबीसाठीच का वापरता? असा प्रश्न चौधरी यांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App