नाशिक : मुंबईच्या शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे महाराष्ट्रातल्या भाजपने हुश्श केले!! कारण महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या मतांमध्ये टक्केवारीत जी थोडीफार तफावत होती, ती मनसेच्या पाठिंब्यामुळे महायुतीच्या बाजूने झुकून काही प्रमाणात का होईना पण वाढेल, अशी भाजपला अपेक्षा करता येणे शक्य होणार आहे. Raj thackeray has become political reserved force for Modi BJP in maharashtra
राज ठाकरे यांनी त्यांच्या विशिष्ट “ठाकरे स्टाईलने” कुठल्याही वाटाघाटी न करता किंवा जागांची अपेक्षा न धरता फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला, पण त्याच वेळी मनसेच्या “इंजिन” या चिन्हावर महाराष्ट्रातल्या निवडणुका ते आपल्या मर्जीप्रमाणे लढवायला “मोकळे” झाले.
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणात बऱ्यापैकी मोकळेपणाने आपली भूमिका मांडली. त्यांनी भाषणात कुठलीही फारसे “बिटवीन द लाईन्स” वाचायला ठेवले नाही. आपले जे काही राजकारण आहे, ते खुले आहे. “बंद” खोलीतले नाही, असे त्यांनी स्पष्ट करून टाकले. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या राजकारणाचा बऱ्यापैकी खुलासा झाला. आता फक्त लोकसभा निवडणुकीत मनसेने नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायचा पण विधानसभा निवडणूक मात्र जोरदार तयारी करून लढवायची, असे मार्गदर्शन झाल्याने मनसैनिक मोकळेपणाने कामाला लागू शकतात.
राज ठाकरे यांनी फक्त मोदींना पाठिंबा दिला आहे याचा अर्थ देखील नीट समजून घेतला पाहिजे. त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणे नाकारले. स्वकर्तृत्वावर उभा केलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष वाढविण्यावर भर दिला. त्यामुळे मनसैनिकांना एक स्पष्ट दिशा मिळाली. आता मनसैनिक प्रत्येक मतदारसंघात त्यांच्या वकूबानुसार काम करू शकतील आणि आपला वकूब म्हणजेच क्षमता वाढवू देखील शकतील.
राज ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक ताकदीने लढवण्याचे जाहीर केले असले तरी, ती महायुतीमध्ये सामील होऊन अथवा स्वतंत्रपणे लढणार याविषयी मात्र कोणतेही भाष्य केलेले नाही… आणि यातच राज ठाकरे यांच्या राजकारणाचे खरे “राजकीय इंगित” दडले आहे. अन्यथा गेल्या वर्ष – दीड वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा शिवसेना भाजपच्या अन्य नेत्यांबरोबरच्या चर्चा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बरोबरची चर्चा या “फुकटच” घालविल्या, असे म्हणायची वेळ आली असती, पण प्रत्यक्षात तसे घडले नाही आणि घडण्याची शक्यता नाही. म्हणूनच राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेवर कॉन्सन्ट्रेट करेल असे नुसते सूचित करण्यापेक्षा जाहीर करून टाकले आहे.
राज ठाकरेंच्या घोषणेचा सरळ अर्थ असा की, लोकसभेच्या बाबतीमध्ये मोदींच्या भोवती महायुतीतले सगळे पक्ष एकवटले असले, तरी महाराष्ट्र विधानसभेच्या बाबतीत ते तसेच एकवटलेलेच राहतील याची शाश्वती नाही आणि त्यावेळी राज ठाकरे यांच्या मनसेची खरी “राजकीय किंमत” भाजप सारख्या पक्षाला ओळखावी लागणार आहे. एक प्रकारे राज ठाकरे यांनी ते नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रातला “रिझर्व्ह फोर्स” आहेत असेच सूचित केले आहे.
– मोदी + राज यांचा विचार दूरदृष्टीचा
लोकसभा निवडणुकीचे निकाल महायुतीच्या दृष्टीने काही विपरीत लागले, एकनाथ शिंदेंची शिवसेना किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी यांनी काही “वेगळा” विचार केला, तर आपल्या हाताशी एखादा तोडीस तोड “रिझर्व्ह फोर्स” असावा, असा विचार नरेंद्र मोदींसारख्या दूरदृष्टी असलेल्या राजकीय नेत्याने केला असल्यास नवल नाही. तसा तो विचार राज ठाकरे यांनी करणेही नवल नाही. कारण या दूरदृष्टीच्या विचारात मोदींच्या भाजपचा जसा लाभ आहे, तसाच किंबहुना जास्त लाभ राज ठाकरेंच्या मनसेचा आहे. कारण बिनशर्त पाठिंब्याच्या बदल्यात राज ठाकरेंना मोदींच्या “सत्तेची संलग्नता” मिळणार आहे. त्यामुळे फक्त स्वतंत्र भूमिका घेऊन स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यापेक्षा नरेंद्र मोदींचा “रिझर्व्ह फोर्स” म्हणून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपर्यंत काम करणे यात राज ठाकरे यांना मोठा लाभ दिसला असणार आहे.
त्याचबरोबर मोदींच्या भाजपसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबरचे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबरचे महाराष्ट्रातले सत्ता संतुलन नीट साधण्यासाठी देखील त्याचा मोठा लाभ असणार आहे. राज ठाकरे हे नरेंद्र मोदींचे महाराष्ट्रातले “रिझर्व्ह फोर्स” बनले आहेत, हा याचा खरा अर्थ आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App