नाशिक : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होत असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजी असतील, नाराज असतील किंवा आजारी असतील, पण म्हणून भाजप अजित पवारांना त्यांच्या राजकीय वजनापेक्षा काही भारी देईल का??, हा खरा सवाल आहे. हा सवाल अजितदादांच्याच दिल्ली दौऱ्यामुळे समोर आला आहे.
अजितदादांनी काल म्हणे, अचानक दिल्ली गाठली, पण गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना भेटीची वेळच दिली नाही. ते पोलीस महासंचालकांच्या बैठकीसाठी चंडीगडला निघून गेले. त्यावर अजितदादांनी काही सारवासारव केल्याची पण बातमी आली. आपण कुटुंबासह दिल्लीत फिरायला आलो असल्याचे ते म्हणाले. अजितदादांच्या पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांनी देखील अजितदादांच्याच वक्तव्याला दुजोरा दिला. अमित शाह चंडीगडला बैठकीसाठी जाणार आहेत हे आम्हाला माहिती होते. त्यामुळे अजितदादा त्यांच्या भेटीसाठी दिल्लीत आलेच नाहीत, असा दावा सुनील तटकरे यांनी केला.
पण एकनाथ शिंदे नाराज असल्यामुळे त्यांच्या नाराजीचा राजकीय लाभ आपल्या पक्षाला करवून घेण्यासाठी मधल्या मध्ये अजितदादांनी शरद पवारांचा “डाव” टाकून पाहिला, पण भाजपचे नेतृत्व त्यामुळे नाराज झाले आणि अमित शाह यांनी अजितदादांना भेट नाकारली, अशा बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या. यात अजितदादांनी मलईदार खाती वाढवून मागितली, असा मसालाही माध्यमांनी बातम्यांमध्ये भरला.
यातल्या वर उल्लेख केलेल्या बातम्या खऱ्या किंवा खोट्या ठरविण्याच्या फंदात न पडता या संदर्भात काही सवाल जरी केले आणि त्यांचे खरे उत्तर मिळवले, तरी अजितदादांच्या दिल्ली दौऱ्याचे त्यांना मिळालेले किंवा न मिळालेले फलित या संदर्भात वास्तवदर्शी उत्तर मिळेल.
एकनाथ शिंदे राजी असोत किंवा नाराज असोत किंवा ते आजारी असोत, ते काहीही असले तरी भाजप अजित पवारांच्या राजकीय वजनापेक्षा जास्त काही पदे त्यांच्या पदरात टाकेल का?? अजितदादांचे महत्त्व महायुतीमध्ये अनावश्यक वाढवून ठेवेल का??, हे सवाल आहेत आणि या प्रश्नाचे सरळ उत्तर नकारार्थी आहे.
मूळात अजितदादा स्वतःच्या “टर्म्स अँड कंडिशन्स”वर महायुतीत आलेलेच नाहीत किंबहुना भाजपने त्यांना त्यांच्या “टर्म्स अँड कंडिशन्स”वर महायुतीमध्ये घेतलेलेच नाही. अजितदादांचे महायुती मधले अस्तित्व हे भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या मर्जीवर अवलंबून आहे. त्यांची मर्जी फिरली, तर एक क्षणही अजितदादा आणि त्यांचा पक्ष महायुती टिकू शकणार नाहीत, अशी खरी आजची राजकीय अवस्था आहे.
त्यामुळे अजितदादा दिल्लीत गेले काय किंवा न गेले काय, त्यांना भाजप स्वतःच्या मर्जीनुसार जे द्यायचे तेवढे देणार आणि त्यांच्या राजकीय ताकदीरपेक्षा अधिक देण्याची शक्यता नाही, हीच यातली वस्तुस्थिती आहे. त्यात एकनाथ शिंदेंच्या राजी असण्याचा किंवा नाराज असण्याचा किंवा आजारी असण्याचा फारसा संबंधच नाही. कारण आत्ताच्या राजकीय परिस्थितीनुसार आणि महाराष्ट्रातल्या आकड्यांनुसार शिंदे किंवा अजितदादांच्या कुबड्यांची भाजपला बिलकुल गरज नाही. उलट सत्तेसाठी शिंदे आणि अजितदादांना भाजपच्या शिडीची गरज आहे, अन्यथा आर्थर रोड किंवा तिहार कडे जाणारे रस्ते मोकळे आहेत, हे त्या पलीकडचे राजकीय वास्तव आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App