विशेष प्रतिनिधी
मुंबई : BJP leadership महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपद सोडणे, त्यानंतर नवीन सरकार स्थापन होऊन नवीन मुख्यमंत्री विराजमान होणे या पॉवर शिफ्टिंगचा राजकीय पचनाचा वेळ सध्या महाराष्ट्रात देण्यात येतोय, असेच दिल्ली आणि मुंबईतल्या एकूण राजकीय हालचालींमधून दिसून येत आहे.
गेल्या अडीच वर्षांमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला टप्प्याटप्प्याने तयार करून “सत्ता केंद्रित” केले होते, ते “सत्ताकेंद्र” जर त्यांच्या व्यक्तिगत वलयापासून आणि त्यांच्या शिवसेनेपासून दूर करून पुन्हा भाजपकडे घ्यायचे असेल, तर त्याला विशिष्ट वेळ लागेल आणि तो वेळ आपण दिला पाहिजे, अशाच मनोभूमीत भाजपचे श्रेष्ठी दिसत आहेत. त्यातूनच बैठकांचा सिलसिला सुरू करून टप्प्याटप्प्याने एक एक मुद्दा सोडविला जातोय.
याला काही लोकांनी काँग्रेस ही प्रवृत्तीचे “ठंडा करके खाओ” असे नाव दिले असले तरी, काँग्रेसी संस्कृतीतली मुख्यमंत्री पदाची शर्यत आणि त्या पाठोपाठ येणारी मंत्रिपदांची शर्यत महायुतीमध्ये असली, तरी तिचा फार मोठा परिणाम भाजपमध्ये दिसण्याची शक्यता नाही. कारण भाजपच्या राजकीय संस्कृतीचा तो भागच नाही, किंबहुना तो अद्याप बनलेला नाही. कारण भाजपचे केंद्रीय नेतृत्व कधी नव्हते, एवढे बळकट झालेले आहे.
त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या बॉडी लँग्वेज वरून कितीही तर्कवितर्क लढविले गेले असले तरी, त्यांची राजी किंवा नाराजी याला विशिष्ट टप्प्यापर्यंतच भाजप श्रेष्ठी महत्त्व देतील, ही बाब उघड होती आणि तसेच घडले. एकनाथ शिंदे अपेक्षेप्रमाणे मोदी – शाह केंद्रीत भूमिका घेते झाले.
पण तरीही महाराष्ट्रातले “पॉवर सेंटर” एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेकडून पूर्णपणे भाजप केंद्रित करताना जो राजकीय पचनाचा वेळ लागतो आहे, तो देण्याचे काम सध्या भाजप श्रेष्ठी करत आहेत. भाजपला महाराष्ट्रावर पुन्हा आपली मांड पक्की करायची आहे. यात नेतृत्व पदाचा मुद्दा महत्त्वाचा असला तरी तो मांड पक्की करण्यापेक्षा दुय्यम आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नेतृत्वपदी देवेंद्र फडणवीस येणार की अन्य कोणी येणार, या चर्चा माध्यमे आणि इतरांसाठी महत्त्वाच्या असले तरी, त्या तेवढ्या प्रमाणात भाजपसाठी महत्त्वाच्या नाहीत. याबाबतीत भाजपची राजकीय परिमाणे पूर्ण वेगळी आहेत, जिचे आकलन करणे आज तरी भल्याभल्यांना अशक्य आहे.
भाजपला महाराष्ट्रामध्ये पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने आणि तो केवळ नंबर एकचा न ठेवता पूर्णपणे महाराष्ट्रव्यापी बनविणे यासाठी सध्या इतका अनुकूल काळ दुसरा नाही. अशा स्थितीत केवळ नेता निवड किंवा मंत्रिमंडळ निवड एवढ्या संकुचित पद्धतीने विचार करून भाजप श्रेष्ठी निर्णय घेण्याची सुताराम शक्यता नाही. त्या उलट एक विशिष्ट कार्यक्रम पत्रिका आणि कार्यपद्धती ठरवूनच पुढच्या 5 ते 10 वर्षांसाठी एक रोड मॅप ठरवून निर्णय घेतला जाईल. ही प्रक्रिया भाजपमध्ये निरंतर सुरू आहे आणि ती वेळखाऊ आहे. महाराष्ट्रात भाजप केंद्रित महायुतीचे सरकार येणे हा या प्रक्रियेतल्या अनेक भागांपैकी एक महत्त्वाचा भाग आहे. त्या दृष्टीने रणनीती ठरवून पावले टाकण्यात येत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App