नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार एवढे अस्वस्थ झाले, की त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या राजकारणातून थेट राजकीय संन्यासच जाहीर करून टाकला. पण सिल्लोड तालुक्यातल्या अंभई येथे जाहीर कार्यक्रमात सत्तार यांनी संन्यास जाहीर करताना जी आदळापट केली, त्यातून हा खरंच त्यांचा राजकीय संन्यास आहे की नवा पॉलिटिकल स्टंट आहे??, असा सवाल तयार झाला.
कारण या कार्यक्रमात बोलताना अब्दुल सत्तार यांनी भविष्यातले राजकारण केवळ जातीच्या धर्माच्या आधारे केले जाणार आहे. ते राजकारण आपल्याला जमणार नाही. पाच वर्षे हमाला सारखे काम करायचे. विकास कामे करायची आणि शेवटी जाती धर्मावर निवडणूक गेली की पराभवाचे तोंड पाहावे लागायचे. त्यापेक्षा असले राजकारणच नको. सिल्लोड मध्ये पुढची निवडणूक मी लढणार नाही, असे जाहीर करून टाकले.
अब्दुल सत्तार यांच्यासारख्या सगळे पक्ष फिरून आलेल्या नेत्याने जाती-धर्माच्या आधारावर निवडणूक गेल्या विषयी खंत व्यक्त करावी, यासारखा दुसरा “राजकीय विनोद” नाही. कारण मूळात अब्दुल सत्तार यांनी आपल्या अख्ख्या राजकीय कारकीर्दीत काँग्रेसमध्ये असताना जाती-धर्माचेच राजकारण केले. सिल्लोड सारख्या मतदारसंघात मुस्लिमांची पॉकेट्स बनवून तिथल्याच एकगठ्ठा मतदानाच्या बळावर संपूर्ण मतदारसंघावर “राज्य” केले. आपल्याच सगळ्या समर्थकांना मसल + मनी पॉवर दिली.
अब्दुल सत्तारांचे सर्वपक्षीय विरोधक त्यांच्यावर नेमका हाच आरोप करतात. पण 2019 पूर्वी काँग्रेसची उतरती कळा पाहून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून आपले राजकीय अस्तित्व टिकवले. त्यानंतर उद्धव ठाकरेंची साथ सोडून सत्तार एकनाथ शिंदे यांच्या सत्तेच्या वळचणीला निघून गेले, पण आता एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांना मंत्री केले नाही म्हणून सत्तारांनी सगळी आदळआपट सुरू केली.
पण हे तेच अब्दुल सत्तार आहेत, ज्यांनी स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी मी पुन्हा येईन, अशी सर्वपक्षीय नेत्यांसमोर घोषणा केली होती. राज्यात पुन्हा मंत्रीपद मिळवण्यासाठी कंबर कसली होती. मग सत्तारांनी वाढदिवशी केलेली घोषणा खरी की अंभई मधल्या भाषणात केलेली राजकीय संन्यासाची घोषणा खरी??, हा अब्दुल सत्तारांच्या राजकारणावरचा खरा सवाल आहे. या सवालाचे उत्तर कुणीच सत्तारांना विचारले नाही म्हणून त्यांनी ते दिले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App