‘आधी नीट ऐकून घ्या, प्रत्येक आरोप सहन करणार नाही’; संजय शिरसाट संतापले, हसन मुश्रीफांना थेट इशारा

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरून महायुतीत नवा वाद निर्माण झाला आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी आक्षेप घेतल्यानंतर शिरसाट चांगलेच आक्रमक झाले. ‘मला बोलायला भाग पाडू नका, अन्यथा कोणतीही दयामाया ठेवणार नाही,’ अशा शब्दांत त्यांनी मुश्रीफांना सुनावले.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी, त्यात पार्थ पवार यांची उपस्थिती आणि दोन्ही गटांतील राजकीय हालचाली यामुळे विलीनीकरणाच्या चर्चेला अधिक वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतील नेत्यांकडूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता या मुद्द्यावरून महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्येच शाब्दिक संघर्ष सुरू झाला आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर भाष्य केले होते. कोणताही राजकीय निर्णय घेताना संबंधित पक्षांना आपल्या समविचारी पक्षांना आणि महायुतीतील घटक पक्षांना विचारात घ्यावे लागेल, असे त्यांनी म्हटले होते.

यावेळी शिरसाट म्हणाले होते की, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांच्यात नेमक्या काय घडामोडी सुरू आहेत, याबाबत सध्या भाष्य करणे उचित ठरणार नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत इतक्या लवकर निष्कर्ष काढणे योग्य नाही.

हसन मुश्रीफांच्या विधानावर शिरसाटांचा पलटवार

दरम्यान, संजय शिरसाट यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली होती. शिरसाट यांनी अशा विषयांवर बोलू नये. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज द्यावी, अशी भूमिका मुश्रीफ यांनी मांडली होती.

मुश्रीफ यांच्या या विधानानंतर संजय शिरसाट चांगलेच संतापले. त्यांनी थेट मुश्रीफांना प्रत्युत्तर देत आपली नाराजी व्यक्त केली. “हसन मुश्रीफ यांनी माझे स्टेटमेंट नीट ऐकलेले दिसत नाही. आधी नीट ऐकून घ्या. दरवेळी काहीही आरोप केले तर ते मी सहन करणार नाही, हे खात्रीने सांगतो,” असा इशारा त्यांनी दिला.

पुढे बोलताना शिरसाट म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या आपापसात कपडे फाडाफाडी सुरू आहे. त्यामुळे तिसरा पक्ष उदयाला येऊ शकतो, असे आपण म्हटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसवर आपण नेमकी कोणती टीका केली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‘मला बोलायला भाग पाडू नका, दयामाया ठेवणार नाही’

संजय शिरसाट यांनी यावेळी केवळ नाराजी व्यक्त करून न थांबता मुश्रीफांना थेट इशाराही दिला. “काय चाललंय हे संजय शिरसाट चांगल्या प्रकारे जाणतो. मी तुम्हाला विनंती करतो की, अशी स्टेटमेंट तुम्हीही करू नका. मला बोलायला भाग पाडू नका. नाहीतर मी कोणतीही दयामाया ठेवणार नाही,” असे ते म्हणाले.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेने आधीच राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना आता या मुद्द्यावरून महायुतीतील दोन घटक पक्षांच्या नेत्यांमध्येच जुंपली आहे. त्यामुळे संजय शिरसाट आणि हसन मुश्रीफ यांच्यातील हा वाद पुढे कोणते वळण घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Sanjay Shirsat gets angry, issues a direct warning to Hasan Mushrif

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात