विशेष प्रतिनिधी
मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवणे आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली बडतर्फ करण्यात आलेला माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा हादरा दिला आहे. विशेष सत्र न्यायालयाने गेल्या महिन्यात वाझेला मंजूर केलेला जामीन मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी पूर्णपणे रद्दबातल ठरवला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत तातडीने याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेचा युक्तिवाद ग्राह्य धरत हा जामीन फेटाळल्यामुळे, गेल्या ५ वर्षांहून अधिक काळ तुरुंगात खितपत पडलेल्या सचिन वाझेचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम आता कायम राहणार आहे.
मार्च २०२१ मध्ये देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणात सचिन वाझेच्या सुटकेची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे वाझेला पुन्हा एकदा मोठा कायदेशीर धक्का बसला आहे.
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाचा निकाल
एनआयएच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर प्रदीर्घ आणि चुरशीची सुनावणी पार पडली. विशेष न्यायालयाने गेल्या महिन्यात वाझेला जामीन मंजूर केला होता. मात्र, एनआयएने त्वरित उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने त्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली होती.
१६ ऑक्टोबरला निकाल ठेवला होता राखून
दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने १६ ऑक्टोबर रोजी आपला निकाल राखून ठेवला होता. गुरुवारी हा निकाल जाहीर करताना खंडपीठाने विशेष सत्र न्यायालयाचा जामीन मंजूर करण्याचा निर्णय थेट रद्द केला.
स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी आणि ‘सुपर कॉप’ बनण्यासाठीच रचला कट
सुनावणीदरम्यान एनआयएच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (ASG) अनिल सिंह यांनी सचिन वाझेच्या कारनाम्यांचा कोर्टात पाढा वाचला. “वाझे याला यापूर्वी एका बनावट चकमक प्रकरणात सहभागी असल्यामुळे पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले होते. नंतर त्याला पुन्हा सेवेत घेऊन मुंबई पोलिसांच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे (CIU) प्रमुखपद देण्यात आले होते.”
स्वतःच गुन्हा घडवला आणि स्वतःच तपास केला
“समाजात आणि खात्यात स्वतःची गेलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी आणि ‘सुपर कॉप’ म्हणून प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी वाझेनेच अँटिलियाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार पार्क करण्याचा हा भयानक कट रचला. हा तपास आपल्याकडेच येईल अशी व्यवस्था त्याने केली, जेणेकरून गुन्ह्याचा छडा आपणच लावल्याचा आव आणून वाहवा मिळवता येईल.”
दहशत माजवणे आणि हिरेन यांची हत्या
“हा कट केवळ अंबानी कुटुंबाला धमकावण्यापुरता नव्हता, तर संपूर्ण समाजात भीती व दहशत पसरवण्यासाठी होता. या कारचा खरा मालक असलेला व्यावसायिक मनसुख हिरेन आपले बिंग फोडेल आणि कट उघडकीस आणेल, या प्रचंड भीतीपोटी वाझेनेच हिरेन यांची हत्या घडवून आणली,” असा घणाघाती युक्तिवाद तपास यंत्रणेने केला.
जिलेटिन कांड्यांना फ्यूज नव्हता, ३२० साक्षीदार बाकी
दुसरीकडे, सचिन वाझेचे वकील व्ही. एम. थोरात यांनी जामिनाचे जोरदार समर्थन केले होते. “अँटिलियाबाहेर जप्त केलेल्या जिलेटिनच्या कांड्यांना कोणताही डिटोनेटर किंवा फ्यूज जोडलेला नव्हता. त्यामुळे अशा स्फोटकांची जप्ती म्हणजे बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (UAPA) दहशतवादी कृत्य ठरत नाही,” असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला.
५ वर्षे उलटली तरी खटला सुरू नाही
“मार्च २०२१ मध्ये अटक झाल्यापासून जवळपास ५ वर्षे उलटून गेली, तरी प्रत्यक्ष खटला सुरू झालेला नाही. या खटल्यात तब्बल ३२० साक्षीदारांच्या साक्षी नोंदवणे शिल्लक आहे. त्यामुळे हा खटला कधी पूर्ण होईल याचा नेम नाही.”
प्रदीप शर्मांच्या जामिनाचा दाखला
जन्मठेपेची शिक्षा होऊनही माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना दिलासा मिळाला असून इतर सर्व सहआरोपी जामिनावर बाहेर आहेत; त्यामुळे समानतेच्या तत्त्वावर वाझेलाही अनिश्चित काळ तुरुंगात न ठेवता जामीन मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती.
मात्र, आरोपांचे अत्यंत गंभीर स्वरूप, कटाची व्याप्ती आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे भक्कम पुरावे लक्षात घेता, उच्च न्यायालयाने बचाव पक्षाचे सर्व युक्तिवाद फेटाळून लावत सचिन वाझेचा जामीन रद्द केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App