विशेष प्रतिनिधी
ठाणे: “काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांची खरी लढाई भारतीय जनता पक्षाशी नसून थेट भारत देश आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाशी आहे! आज आम्हाला लोकशाहीचे ढोंगी धडे देणाऱ्या काँग्रेसने स्वतःचा काळा इतिहास तपासण्याची गरज आहे. 1975 मध्ये भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकणाऱ्या दिवंगत इंदिरा गांधींची निवडणूक जेव्हा न्यायालयाने रद्द केली, तेव्हा याच काँग्रेसने संविधानाची अक्षरशः मोडतोड करत लोकशाहीचा गळा घोटला होता. आज मतचोरीचा (वोट चोरी) बिनबुडाचा कांगावा करणाऱ्या याच लोकांनी त्या काळात प्रत्यक्षात देशाचे ‘संविधान चोरी’ करण्याचे महापाप केले होते,” अशा अत्यंत आक्रमक शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
ठाणे येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘लोकतंत्र बचाव पदयात्रेत’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधींचे परदेश दौरे, चीनकडून मिळालेला कथित निधी, सर्वोच्च न्यायालयावरील मोर्चे आणि काँग्रेसच्या कार्यकाळातील आणीबाणीचा इतिहास मांडत विरोधी पक्षांच्या दाव्यांचे वाभाडे काढले.
राहुल गांधी परदेशात कशासाठी जातात?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवर थेट निशाणा साधत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “दिवंगत इंदिरा गांधींनी ज्या पद्धतीने लोकशाही पायदळी तुडवली, आज त्यांचेच नातू राहुल गांधी तोच जुना अजेंडा आणि फुटीरतावादी राजकारण घेऊन पुन्हा मैदानात उतरले आहेत.”
चीनच्या डोनेशनवर सवाल
“राहुल गांधी कायम परदेशात फिरत असतात; ते तिथे नेमके कशासाठी जातात आणि कोणाला भेटतात? भारताला नेहमी पाण्यात पाहण्याचे आणि सीमेवर त्रास देण्याचे काम चीन करत असतो. मग असा प्रश्न पडतो की, राहुल गांधींच्या पक्षाला आणि त्यांच्या कौटुंबिक ट्रस्टला चीनकडून भरमसाठ डोनेशन का मिळत आहे? भारताचे हित विरोधकांना नको असून चीनच्या पैशांवर भारतात अराजकता पसरवण्यासाठीच काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे का?” असा संतप्त सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
लाल पुस्तकाचा मुखवटा; नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश पॅटर्न भारतात राबवण्याचा कट!
विरोधकांच्या हातात दिसणाऱ्या लाल रंगाच्या संविधानाच्या प्रतीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी धोक्याचा इशारा दिला. “सध्या विरोधकांकडून एक नवीन ‘लाल पुस्तक’ मिरवले जात आहे. हे लाल संविधान म्हणजे देशाच्या डोळ्यात धूळफेक करणारा एक मुखवटा आहे. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ संविधान नसून, ही चीनची ‘लाल व्यवस्था’ (साम्यवादी अराजकता) भारतात आणण्यासाठी रचलेला कट आहे.”
शेजारील देशांप्रमाणे अस्थिरतेचा डाव
“याच लाल विचारसरणीचा आणि अजेंड्याचा वापर करून शेजारील नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये सत्ता उलथवून अराजकता माजवण्यात आली. तीच धोकादायक रणनीती आज भारतात राबवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. हातात लाल पुस्तक घेऊन संविधानाने निर्माण केलेल्या एका-एका स्वायत्त संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनाम करण्याचे षडयंत्र आखले जात आहे.”
सर्वोच्च न्यायालयावर मोर्चे नेणे हीच खरी हुकूमशाही
न्यायव्यवस्था आणि स्वायत्त संस्थांना वेठीस धरणाऱ्या विरोधकांचा समाचार घेताना ते म्हणाले, “ज्या संविधानाने देशात सर्वोच्च न्यायालय निर्माण केले, त्याच सर्वोच्च न्यायालयावर आणि मुख्य न्यायाधीशांवर आज हे लोक थेट मोर्चे काढत आहेत. हीच खरी अराजकता आणि झुंडशाही आहे. सर्वोच्च न्यायालयावर मोर्चे निघत असताना ‘संविधान वाचवा’चा गजर करणारे कथित पुरोगामी आज मूग गिळून गप्प का बसले आहेत?”
आंबेडकरांचे संविधान वाचवण्यासाठी भाजप रस्त्यावर
“विरोधकांना देशात शांतता, लोकशाही आणि संविधान टिकू द्यायचे नाही. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पवित्र संविधान वाचवण्यासाठी आणि देशाची अखंडता टिकवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुती रस्त्यावर उतरून कोणत्याही थराला जाऊन मुकाबला करण्यास समर्थ आहे.”
1976 मध्ये काँग्रेसनेच गोठवले होते मूलभूत अधिकार
आणीबाणीच्या काळातील काँग्रेसच्या दडपशाहीची आठवण करून देताना फडणवीस म्हणाले, “संविधान सभेत भाषण करताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते की, या संविधानाचा आत्मा म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाला मिळालेले मूलभूत अधिकार आहेत, जे समाजात खरी समानता प्रस्थापित करतात. मात्र, याच काँग्रेसने 1976 मध्ये 42 व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून नागरिकांचे मूलभूत अधिकार गोठवून टाकले होते.”
न्यायालयात जाण्याची बंदी उठवली
“आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांसाठी नागरिकांना सर्वोच्च न्यायालयात जाता येणार नाही, अशी हुकूमशाही काँग्रेसने लादली होती. पुढे 1977 मध्ये जनतेने काँग्रेसचा दारुण पराभव केला आणि जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर देशवासीयांना त्यांचे हक्क पुन्हा मिळवून देण्यात आले. त्यामुळे संविधानाची हत्या करणाऱ्यांनी आम्हाला लोकशाही शिकवू नये,” असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App