महाराष्ट्र बनणार देशाचे EV हब; महामार्गांवर चार्जिंग स्टेशनचे जाळे!

विशेष प्रतिनिधी

पुणे : स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याला महाराष्ट्र सरकारने प्राधान्य दिले असून, राज्य इलेक्ट्रिक वाहन (EV) निर्मितीच्या क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. पुण्यासह छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर ही शहरे ईव्ही उद्योगाची महत्त्वाची केंद्रे म्हणून विकसित होत आहेत. आगामी काळात महाराष्ट्र देशातील इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे प्रमुख केंद्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच राज्यातील प्रमुख महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधांचे व्यापक जाळे उभारण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

पुण्यात ईकेए मोबिलिटी आणि पिनॅकल समूहाच्या सहा नवीन उत्पादन सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, बी. एल. संतोष, ज्येष्ठ उद्योजक डॉ. अभय फिरोदिया, ईकेए मोबिलिटीचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता, सुनंदा मेहता यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

तीन वर्षांत राज्याला ५० हजार इलेक्ट्रिक बसची गरज

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढल्यास प्रदूषण कमी होण्यासोबतच जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व आणि इंधन आयात कमी करण्यास मदत होईल. ऑटोमोबाईल उद्योग हा रोजगारनिर्मितीचा महत्त्वाचा स्रोत असून, या क्षेत्राच्या विस्तारामुळे त्याला पूरक असलेल्या विविध उद्योगांनाही चालना मिळणार आहे.

पुढील तीन वर्षांत महाराष्ट्राला सुमारे ५० हजार इलेक्ट्रिक बसची आवश्यकता भासणार आहे. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी राज्यातील वाहन उत्पादक कंपन्यांनी आपली उत्पादन क्षमता वाढवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

महामार्गांवर चार्जिंग स्टेशनचे जाळे

इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी केवळ वाहननिर्मिती पुरेशी नसून, त्यासाठी सक्षम पायाभूत सुविधा उभारणेही आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने चार्जिंग सुविधांच्या विस्तारासाठी सर्वंकष आराखडा तयार केला आहे.



वाहन उत्पादक कंपन्यांच्या सहकार्याने राज्यातील प्रमुख महामार्गांवर चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पांसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणे, विविध परवानग्या मिळवणे आणि पायाभूत सुविधा निर्माण करणे यासाठी राज्य सरकार सहकार्य करेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हरित ऊर्जेच्या वापरावर सरकारचा भर

इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असताना त्यासाठी लागणारी वीजदेखील पर्यावरणपूरक स्रोतांमधून उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील वीज निर्मितीमध्ये हरित ऊर्जेचा वाटा वाढविण्यावर सरकार भर देणार आहे.

तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी किफायतशीर दरात वीज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येतील. यामुळे ईव्ही वापरकर्त्यांना दिलासा मिळण्यासोबतच इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेचा विस्तार होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

महिलांना रोजगाराची संधी; कर्मचारी भागधारक मॉडेलचे कौतुक

पिनॅकल समूहाच्या उत्पादन सुविधांमध्ये महिला सक्षमीकरणालाही महत्त्व देण्यात आले आहे. समूहाच्या एका उत्पादन केंद्रात सुमारे ५० टक्के कर्मचारी महिला आहेत. त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

याशिवाय प्रत्येक कर्मचारी हा कंपनीचा भागधारक असण्याचे मॉडेलही उल्लेखनीय असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा

ईकेए मोबिलिटी आणि पिनॅकल समूहाच्या नव्या उत्पादन सुविधांमुळे राज्यातील इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षमतेत वाढ होणार आहे. महाराष्ट्रातील ईव्ही वाहनांची वाढती मागणी राज्यातच पूर्ण करण्यासाठी या सुविधांचा उपयोग होईल. यामुळे नवीन रोजगारनिर्मिती, पूरक उद्योगांचा विस्तार आणि गुंतवणुकीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

इलेक्ट्रिक वाहन निर्मिती, हरित ऊर्जेचा वापर आणि महामार्गांवरील चार्जिंग सुविधांचा विस्तार या तिन्ही आघाड्यांवर नियोजनबद्ध काम करून महाराष्ट्राला देशातील प्रमुख ईव्ही उत्पादन केंद्र बनविण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Maharashtra to become the country’s EV hub; a network of charging stations to be set up along highways!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात