विशेष प्रतिनिधी
बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या ५ नोव्हेंबर रोजी कारखान्याच्या मुख्य कार्यालयातील जिजाऊ सभागृहात सकाळी ११ वाजता निवड प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीत सर्वच्या सर्व २१ जागांवर विजय मिळविल्यानंतर आता कारखान्याच्या नेतृत्वाची धुरा कोणाकडे सोपविली जाणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
अध्यक्षपदासाठी राजवर्धन शिंदे, प्रमोद काकडे, संग्राम सोरटे आणि सुनील भगत यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. राजवर्धन शिंदे यांनी यापूर्वी दोन वेळा कारखान्याचे अध्यक्षपद भूषविले असून, संचालक म्हणून त्यांची ही चौथी टर्म आहे. कारखान्याच्या कामकाजाचा अनुभव त्यांच्या जमेची बाजू मानली जाते. जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रमोद काकडे यांच्याकडेही राजकीय आणि सहकार क्षेत्रातील अनुभव आहे.
त्यामुळे अनुभवी संचालकांमधून अध्यक्ष निवडला जाणार की अन्य नावाला संधी मिळणार, याची उत्सुकता आहे. दुसरीकडे, उपाध्यक्षपदासाठी अभिजित काकडे आणि ऋषिकेश गायकवाड यांच्या नावांची चर्चा आहे. दोघेही दुसऱ्यांदा संचालक म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे तरुण नेतृत्वाला संधी देण्याचा विचार झाल्यास त्यांच्या नावांचा प्राधान्याने विचार होण्याची शक्यता आहे.
अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा निर्णय अंतिम मानला जात आहे. त्यामुळे ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवड प्रक्रियेत त्या कोणाला संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App