बावधन आणि धायरीतील प्लांटवरील पाडकामाला विरोध; एकसमान नियमावली जाहीर होईपर्यंत कारवाई थांबवण्याची मागणी
विशेष प्रतिनिधी
पुणे : शहरातील रेडी मिक्स काँक्रिट (RMC) प्लांटवर पुणे महापालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या पाडकामाच्या कारवाईवरून वाद निर्माण झाला आहे. मे महिन्यात झालेल्या बैठकीत एकसमान नियमावली तयार होईपर्यंत कोणत्याही RMC प्लांटवर कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र, या आश्वासनाला हरताळ फासून महापालिकेने थेट पाडकामाची कारवाई सुरू केल्याचा आरोप पुणे रेडी मिक्स काँक्रिट असोसिएशनने केला आहे.
बावधन आणि धायरी येथील RMC प्लांटवर करण्यात आलेल्या कारवाईला संघटनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली. तसेच सुरू असलेली पाडकामाची मोहीम तातडीने थांबवावी, अशी मागणी केली.
संघटनेचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांनी सांगितले की, मे महिन्यात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीला महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी RMC उद्योगासाठी एकसमान नियमावली तयार करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. तसेच नियमावली अंतिम होऊन तिची अंमलबजावणी होईपर्यंत कोणत्याही प्लांटवर कारवाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
मात्र, या बैठकीला जवळपास सहा महिने उलटूनही नियमावली जाहीर करण्यात आलेली नाही. उलट महापालिकेने थेट प्लांट पाडण्याची कारवाई सुरू केली आहे. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाचे काय झाले, असा सवाल वाल्हेकर यांनी उपस्थित केला.
RMC प्लांट उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करावी लागते. या उद्योगावर हजारो कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे उदरनिर्वाह अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत कोणतीही स्पष्ट नियमावली नसताना अचानक कारवाई केल्यास प्लांटचालकांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच कामगारांच्या रोजगारावरही परिणाम होण्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली आहे.
याशिवाय RMC प्लांटचे कामकाज विस्कळीत झाल्यास पुण्यातील गृहबांधणी प्रकल्प आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधा विकासकामांवरही परिणाम होऊ शकतो, असा इशारा संघटनेने दिला आहे.
नियमभंग झाल्यास सुधारणा करण्याची संधी द्या
RMC प्लांटसाठी उद्योग प्रतिनिधींशी चर्चा करून एकसमान आणि स्पष्ट नियमावली तातडीने जाहीर करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच बावधन आणि धायरी येथील प्लांटवर करण्यात आलेल्या कारवाईची चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
एखाद्या प्लांटमध्ये नियमांचे उल्लंघन आढळल्यास थेट पाडकाम करण्याऐवजी संबंधित चालकांना त्रुटी दूर करण्याची संधी द्यावी, अशी भूमिका वाल्हेकर यांनी मांडली. आवश्यक असल्यास संबंधित प्लांटचे कामकाज तात्पुरते बंद करून नियमांनुसार सुधारणा करण्यासाठी मुदत द्यावी. त्यानंतरही नियमांचे पालन न झाल्यास पुढील कारवाईचा विचार करावा, असे त्यांनी सुचवले.
आयुक्तांकडून सकारात्मक प्रतिसाद
RMC उद्योगासमोरील अडचणी सोडवण्यासाठी महापालिका प्रशासन, संबंधित सरकारी यंत्रणा आणि उद्योग प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक तातडीने आयोजित करावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.
गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर आयुक्त नवल किशोर राम यांनी संघटनेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा वाल्हेकर यांनी केला. तसेच RMC प्लांटवर थेट पाडकामाची कारवाई करू नये, अशा सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
पर्यावरणविषयक नियमांचे पालन होणे आवश्यक असले, तरी त्याचवेळी RMC उद्योगाच्या व्यावहारिक अडचणी आणि पुण्याच्या बांधकाम क्षेत्रातील त्याचे महत्त्व लक्षात घेऊन प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे. एकसमान नियमावली अधिकृतपणे लागू होईपर्यंत RMC प्लांटवरील पाडकामाची कारवाई स्थगित ठेवावी, अशी मागणी संघटनेने पुन्हा एकदा केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App