विशेष प्रतिनिधी
बारामती : अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर चर्चेत आलेल्या बारामती विमानतळाच्या आधुनिकीकरणाला आता गती मिळणार आहे. विमानतळाच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यातील तब्बल ६५ कोटी रुपयांच्या कामांना राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून ही माहिती दिली.
२८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळावर विमान उतरत असताना झालेल्या भीषण अपघातात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर विमानतळावरील पायाभूत सुविधा, धावपट्टीची स्थिती, कमी दृश्यमानतेत विमान उतरविण्याची यंत्रणा आणि आपत्कालीन सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा मुद्दा ऐरणीवर आला होता. प्राथमिक तपास अहवालातही विमानतळावरील पायाभूत सुविधांबाबत काही त्रुटी नमूद करण्यात आल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या विकासासाठी मंजूर झालेल्या पहिल्या टप्प्यातील कामांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यामध्ये धावपट्टीचे नूतनीकरण, रात्रीच्या वेळी विमानांचे उड्डाण आणि लँडिंग शक्य व्हावे यासाठी आवश्यक प्रकाशयोजना, तसेच विमानतळाभोवती संरक्षक भिंत उभारणे यांसह विविध सुरक्षा सुविधांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, अजित पवार यांनी हयातीतच बारामती विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू केले होते. ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांनी रात्रीच्या लँडिंग सुविधेसह विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतर काही महिन्यांतच याच विमानतळावर झालेल्या दुर्घटनेत त्यांचे निधन झाले.
आता ६५ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाल्याने बारामती विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामांमुळे विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम होण्यासोबतच रात्रीच्या विमान वाहतुकीसह भविष्यातील विस्तारासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित होण्यास मदत होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App