विशेष प्रतिनिधी
मुंबई : महायुतीत राहायचे, एकाच ताटात जेवायचे आणि आमच्याच पाठीत खंजीर खुपसून आमचे पाय तोडायचे, हा ‘शेखचिल्ली’सारखा मूर्खपणा चालणार नाही. ज्या फांदीवर बसलात तीच तोडली तर स्वतःचाच कडेलोट होईल, याचे भान मित्रपक्षाने ठेवावे, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी शिवसेना शिंदे गटाला दिला. Pravin Darekar
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निकालांनंतर महायुतीमधील शिंदे गटाच्या नेत्यांकडून भाजपवर आणि थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका हाेत आहे. यावर पलटवार करताना पत्रकार परिषदेत बाेलताना दरेकर म्हणाले भाजप कधी टोकाची भूमिका घेत नाही; पण गृहीत धरून सकाळ-संध्याकाळ वार करणार असाल, तर जशास तसे उत्तर द्यायला भाजपही मागे-पुढे पाहणार नाही.
दरेकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण महाराष्ट्र रस्ते, पायाभूत सुविधा आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या योजनांनी वेगाने पुढे जात आहे. मात्र, फडणवीसांविषयी मनात टोकाचा तिरस्कार आणि पोटात मळमळ बाळगून रोज उठून त्यांच्या नेतृत्वावर टीका करणाऱ्यांची नेमकी कुवत आणि औकात काय आहे? सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर स्वतःचेच तोंड भाजते.
विधान परिषद निवडणुकीतील पराभवामुळे राज्यात नेतृत्वबदल हाेऊन एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करावे अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. यावर दरेकर म्हणाले, रवींद्र धंगेकरांसारखे लोक फडणवीसांचे नेतृत्व बदलण्याची भाषा करत आहेत. स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असू शकते, त्याला आमची हरकत नाही; पण देवेंद्र फडणवीसांसारख्या लोकप्रिय नेत्यावर शिंतोडे उडवण्याची तुमची पात्रता आहे का? अशा फुटकळ लोकांच्या वक्तव्यांना भाजप भीक घालत नाही. धंगेकर हे काही अधिकृत किंवा जबाबदार नेते नाहीत. मात्र, ते पुण्याचे महानगरप्रमुख आहेत. वरिष्ठांच्या आशीर्वादाशिवाय ते बोलूच शकत नाहीत. त्यामुळे धंगेकरांच्या विधानाला शिवसेना पक्षाची संमती आहे का, हे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट करावे.”
दरेकर म्हणाले, अमरावती शिक्षक मतदारसंघात भाजपच्या अधिकृत कार्यकर्त्या उभ्या होत्या. मात्र, महायुतीचा धर्म पाळत भाजपने तात्काळ कारवाई करत आमच्याच उमेदवाराला ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले. भाजपने ताकद दिली म्हणूनच शिंदे सेनेचे किरण सरनाईक त्या ठिकाणी जिंकून आले; अन्यथा त्यांचाही पराभव निश्चित होता. पुणे पदवीधर मतदारसंघात आमच्या उमेदवार स्मिता जाधव यांच्याविरोधात मित्रपक्षाने उघडपणे कारवाया केल्या. धंगेकरांनी निवडणुकीपूर्वी जाहीरपणे विरोधकांचे काम केले आणि निकाल आल्यावर आनंदोत्सव साजरा केला. त्यांनी मते वळवली नसती, तर स्मिता जाधव 100% विजयी झाल्या असत्या. मराठवाड्यात तर शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार छातीठोकपणे सांगतायत की, ‘प्रतापसिंह पाटील यांच्या विजयात माझा खारीचा वाटा आहे!’ महायुतीत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाडण्याची हिंमत सत्तारांमध्ये कशी येते? सत्तारांचे हे कृत्य वैयक्तिक आहे की पक्षाचा आदेश होता, याचा खुलासा पक्षनेतृत्वाने केला पाहिजे.
पुण्यात भाजपचा उमेदवार आयात होता, असा आरोप शीतल म्हात्रे करत आहेत. अहो, तुमचे अमरावतीचे किरण सरनाईक कालपर्यंत कुठल्या पक्षात होते? राष्ट्रवादीतून तुमच्या पक्षात आले ना? विधानसभेला तर भाजपचे नेते आणि आमदार एका रात्रीत पळवून तुम्ही तुमचे उमेदवार केले. एका बोटाने आमच्याकडे दाखवताना चार बोटे स्वतःकडे आहेत याचे भान ठेवा, असे प्रत्युत्तर दरेकर यांनी दिली.
दरेकर म्हणाले, “भाजपला आत्मपरीक्षणाचा सल्ला देणाऱ्या आनंद परांजपे यांनी आधी स्वतःला आरशात पाहावे. भाजप दाेन खासदारांपासून स्वबळावर इथपर्यंत पोहोचला आहे, कारण आम्ही चुका दुरुस्त करतो. पण युतीत राहायचे आणि एकत्र नांदताना मित्रपक्षाच्याच पाठीत वार करायचा, हे खपवून घेतले जाणार नाही.” महाराष्ट्रातील जनतेने देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीला निवडून दिले आहे. ‘तो मोठा की मी मोठा’ या ईर्षेतून जर एकमेकांचे पाय खेचले, तर महायुतीचे वातावरण खराब होईल. महायुतीची गरज सर्वांनाच आहे; त्यामुळे मित्रपक्षाने माध्यमांत आततायीपणाने बोलणे थांबवून समन्वय राखावा.
“शेतकरी आत्महत्या करत असतील तर त्यांच्या अंत्यविधीला जाऊ नका, असे वादग्रस्त विधान संजय गायकवाड करतात. शासन दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करत असताना त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा हा विकृत मानसिकतेचा वेडा माणूस आहे. शिंदे साहेबांनी अशा वाचाळवीरांना तात्काळ आवरावे, अशी मागणीही दरेकर यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App