नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपला मोठा धक्का; काँग्रेसच्या अभिजित वंजारींचा ३,२७१ मतांनी विजय!

विशेष प्रतिनिधी

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांनी भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा पराभव करत पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. भाजपसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. निकाल स्पष्ट होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजी करत जोरदार जल्लोष केला.

नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत झाली. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत भाजपचे सुधाकर कोहळे यांनी चार हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत अभिजित वंजारी यांनी जोरदार मुसंडी मारत ही आघाडी मोडून काढली. अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांच्या मतांमधून मिळालेल्या दुसऱ्या पसंतीच्या मतांनी वंजारी यांच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.



नागपूर पदवीधर मतदारसंघ हा अनेक वर्षे भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. जवळपास सहा दशकांच्या वर्चस्वानंतर २०२० मध्ये काँग्रेसने हा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेतला होता. यंदाच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, अभिजित वंजारी यांनी पुन्हा विजय मिळवत काँग्रेसची पकड कायम राखली.

दरम्यान, पराभवानंतर भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी निकाल स्वीकारला. दुसरीकडे, काँग्रेसच्या विजयामुळे महाविकास आघाडीच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिजित वंजारी यांनी गेल्या सहा वर्षांत मतदारसंघात केलेल्या कामाची ही पोचपावती असल्याचे सांगितले. विविध संघटना आणि मतदारांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे विजय शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भाजपच्या राजकारणाविरोधात मतदारांनी दिलेला हा कौल असल्याचा दावाही त्यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा राजकीय प्रभाव असलेल्या नागपुरात भाजपला पराभव स्वीकारावा लागल्याने या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. काँग्रेसने सलग दुसऱ्यांदा हा मतदारसंघ राखल्यामुळे भाजपच्या निवडणूक रणनीतीवर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.

BJP suffers setback in Nagpur Graduates’ Constituency as Congress’s Abhijit Wanjari wins

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात