विशेष प्रतिनिधी
कर्जत : अनेक वर्षांपासून उभी असलेली झाडे तोडून त्यांची लाकडे एकत्र रचून ठेवल्याचे पाहून आपण जंगलाच्या अंतिम संस्काराला आल्यासारखे वाटतोय असा संताप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला. Raj Thackeray
टॉरेंट पॉवरच्या वीज प्रकल्पासाठी कर्जतमधील साय डोंगर परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. बुधवारी सकाळी वृक्षतोड झालेल्या परिसराची पाहणी केल्यानंतर सायंकाळी कर्जतच्या पोलीस मैदानावर झालेल्या जाहीर सभेत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नांची सरबत्ती केली. डेटा सेंटर्स आणि नव्या वसाहतींच्या उभारणीसाठी महाराष्ट्रातील जंगले नष्ट केली जात असल्याचा आरोप करत या प्रकल्पांचा फायदा नेमका कोणाला होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. टॉरेंट पॉवरच्या प्रस्तावित तीन हजार मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी कर्जत परिसरातील ३२ हजारांहून अधिक झाडांची तोड प्रस्तावित आहे. या वृक्षतोडीला स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींकडून तीव्र विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी बाधित परिसराला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
विकासाच्या नावाखाली संपूर्ण जंगल नष्ट करण्याची गरज काय, असा सवाल करत या प्रकल्पाची आवश्यकता सरकारने जनतेसमोर स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.कर्जतमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याच्या वृत्तावरूनही राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.”इंटरनेट बंद केलं तरी सूर्य उगवायचा थांबतो का? कोणत्या जगात राहतात ही माणसं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट बंद करून कोणतीही घटना जगापासून लपवता येणार नाही. एखादा व्हिडिओ काही वेळातच यूट्यूबवर पोहोचतो आणि संपूर्ण जग तो पाहू शकते, असे त्यांनी सांगितले.इंटरनेट बंद करण्यामागे सरकारचा नेमका हेतू काय, असा सवाल करत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला.
महाराष्ट्रात आधीपासून वीज उपलब्ध असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर नवीन वीज प्रकल्पांची आवश्यकता काय, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. डेटा सेंटर्स आणि नवीन वसाहतींच्या नावाखाली राज्यातील जमीन आणि जंगलांचा बळी दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
या प्रकल्पांचा फायदा स्थानिक नागरिकांऐवजी बाहेरून येणाऱ्यांना होणार असल्याचा दावा त्यांनी केला. नव्या वसाहतींमुळे स्थानिक लोकसंख्येचे राजकीय महत्त्व कमी होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.गडचिरोलीतील खाण प्रकल्पांसाठी सुपीक जमीन आणि जंगलांचे नुकसान होत असल्याचा, तसेच मुंबईतील मुलुंड परिसरातही जमिनी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
ग्रामपंचायतींनी विरोधाचे ठराव करूनही स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रातील जमीन, जंगल आणि नैसर्गिक साधनसंपत्तीबाबतचे निर्णय केंद्रातील नेतृत्वाच्या दबावाखाली घेतले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, राज्य सरकारने यापूर्वी या प्रकल्पाचे समर्थन करत महाराष्ट्राच्या वाढत्या वीज गरजा पूर्ण करण्यासाठी स्वच्छ ऊर्जेचे प्रकल्प आवश्यक असल्याची भूमिका मांडली आहे. मात्र, विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी आणि स्थानिकांच्या हिताकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत राज ठाकरे यांनी सरकारच्या प्रकल्प धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App