विशेष प्रतिनिधी
अभिनेता इमरान खान याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारकडून भारत सोडण्याबाबत बजावण्यात आलेल्या नोटिशीच्या अंमलबजावणीला न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत अभिनेत्याविरोधात या नोटिशीच्या आधारे कारवाई होणार नसल्याचे न्यायालयातील सुनावणीदरम्यान स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
१० ऑक्टोबर रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान येथे झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे इमरान खान याला भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आली होती. फॉरेनर्स अँड इमिग्रेशन कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्यास सांगण्यात आले होते.
या नोटिशीला इमरान खान याने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. नोटीस बेकायदेशीर, मनमानी आणि योग्य कारणांशिवाय बजावण्यात आल्याचा दावा त्याने याचिकेत केला. तसेच, आपल्याला या प्रकरणात बळीचा बकरा बनवले जात असल्याचा आरोपही त्याने केला.
न्यायालयात नेमकं काय घडलं?
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी केंद्र सरकारच्या वतीने सोमवारपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केली. तोपर्यंत इमरान खान याच्याविरोधात कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नसल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले.
त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने भारत सोडण्याच्या नोटिशीच्या अंमलबजावणीला अंतरिम स्थगिती दिली. आता २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत या प्रकरणात पुढे काय घडते, याकडे लक्ष लागले आहे.
इमरान खानने याचिकेत काय म्हटलं?
इमरान खान हा अमेरिकेचा नागरिक असून त्याच्याकडे ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (OCI) कार्ड आहे. भारतात वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांनाही भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १४ आणि २१ अंतर्गत संरक्षण मिळते, असा युक्तिवाद त्याने याचिकेत केला आहे.
भारत सोडण्याची नोटीस योग्य कारणांशिवाय आणि मनमानी पद्धतीने देण्यात आल्याचा दावा करत त्याने न्यायालयाकडे दिलासा मागितला होता.
कोण आहे अभिनेता इमरान खान?
इमरान खानने १९८८ मध्ये बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर २००८ मध्ये जाने तू… या जाने ना या चित्रपटातून त्याने प्रमुख अभिनेता म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.
किडनॅप, ब्रेक के बाद, एक मैं और एक तू, मटरू की बिजली का मंडोला आणि गोरी तेरे प्यार में यांसारख्या चित्रपटांत त्याने काम केले. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या कट्टी बट्टीनंतर तो बराच काळ चित्रपटांपासून दूर होता.
आता भारत सोडण्याच्या नोटिशीला स्थगिती मिळाल्यानंतर २ नोव्हेंबरच्या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App