विशेष प्रतिनिधी
जालना: मराठा आंदोलनाच्या विरोधात कशा प्रकारे नियोजन करण्यात आले, कोणत्या आमदाराला किती लोक देण्यात आले आणि कोणत्या व्यक्तीने कोणाला पैसे पुरवले, याची माहिती लवकरच समोर आणणार असल्याचे मराठाआंदोलक मनोज जरांगे यांनी सांगितले. ‘कशा कशा प्लॅनिंग झाल्या, कसे षडयंत्र रचले गेले, कोणत्या आमदाराला किती लोक दिले, याची नावेही थोड्या दिवसांत येणार आहेत. सावध राहून ऐका,’ असा इशारा त्यांनी दिला. Manoj Jarange
जरांगे म्हणाले, कोण कोणाला भेटले आणि आर्थिक व्यवहारांमध्ये कोणाचा सहभाग होता, यासंबंधी आणखी खुलासे करणार आहे.‘थोड्याच दिवसांत आणखी एक बॉम्ब येणार आहे,’ असे म्हणत त्यांनी या प्रकरणात पुढील माहिती उघड करणार आहे.
आपण प्रामाणिकपणे काम करत असल्यामुळे आपल्याला आंदोलन करू दिले जात नाही, असा आरोप करताना मनोज जरांगे म्हणाले, आपण इमानदारीने काम करतो, आपल्याला ते लढू देत नाहीत. म्हणून त्यांनी हे आंदोलन चिरडायचे, मोडायचे आणि मला बदनाम करायचे ठरवले. ते आपण समाजापुढे आणले.
मनोज जरांगे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बलाढ्य शत्रूशी लढताना वेगवेगळ्या रणनीतींचा वापर केला जात असे. शत्रूकडे मोठी फौज, दारूगोळा आणि रणगाडे असले, तरी त्याला त्याच्याच ताकदीने प्रत्युत्तर देण्याची रणनीती आखली जात होती. त्याचप्रमाणे, मराठा समाजाचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आल्यानंतर आपणही पडद्यामागे काय सुरू आहे, हे शोधण्यास सुरुवात केली. माझा समाज आणि समाजाचे आंदोलन जेव्हा यांनी चिरडले, तेव्हा हे कसे चिरडत आहेत, हे शोधायला आम्ही सुरुवात केली. पडद्यामागे नेमके काय चालले आहे, हे समजून घेतले. त्यानंतर पडद्यामागची प्लॅनिंग मराठा समाजासमोर आणली.
आंदोलनाच्या विरोधात बोलणारे अनेक लोक मराठा समाजातीलच असल्यामुळे समाजात संभ्रम निर्माण झाला होता, असे जरांगे यांनी सांगितले. समोरची व्यक्तीही मराठा आणि आपणही मराठा असताना मराठा समाजातीलच काही लोक आंदोलनाच्या विरोधात का बोलत आहेत, असा प्रश्न समाजाला पडत होता.
‘मायबाप हो, मी तीन वर्षे हा त्रास सहन केला. कोण करत आहे, हे कळायला तयार नव्हते. माणसे तर आपलीच होती. आपल्या आंदोलनावर वार करणारा माणूस आपलाच आहे, असे वाटत होते. तो खरोखर नाराज आहे की आपण त्याच्याबाबतीत काही चुकीचे पाऊल उचलले म्हणून तो वेगळा झाला, असा संभ्रम मराठा समाजात होता,’ असे ते म्हणाले.
मात्र, आता या प्रकरणातील कथित षडयंत्र उघड झाल्याचा दावा करत, गेल्या तीन वर्षांपासून पैसे घेऊन आंदोलनाच्या विरोधात बोलले जात असल्याचे आपण सिद्ध करून दिल्याचे जरांगे यांनी म्हटले. या आरोपांच्या समर्थनार्थ त्यांनी सभेत काही दावे केले; मात्र संबंधित व्यक्ती, आमदार किंवा आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र पुष्टी या भाषणातून होत नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App