‘सत्ता बदलायची असेल तर निवडणुका जिंका’; रेजीम चेंजच्या मुद्द्यावर फडणवीसांचा विरोधकांना इशारा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशातील सत्तापरिवर्तन आणि ‘रेजीम चेंज’च्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रशांत भूषण यांच्या सत्तापरिवर्तनासंदर्भातील विधानाचे समर्थन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. “उद्धव ठाकरे स्वतःच्या पक्षातील रेजीम थांबवू शकले नाहीत, ते आता कोणत्या रेजीम चेंजविषयी बोलत आहेत, हेच मला माहिती नाही,” अशा शब्दांत फडणवीस यांनी ठाकरेंना लक्ष्य केले.

‘सत्तापरिवर्तन हवे असेल तर निवडणुका जिंका’

प्रशांत भूषण यांनी केलेल्या रेजीम चेंजसंदर्भातील विधानाचे उद्धव ठाकरे यांनी समर्थन केले होते. निवडणुकीच्या माध्यमातून नागरिकांना आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार हिरावून घेतला जात असेल, तर सत्तापरिवर्तनासाठी उभे राहण्यात गैर काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. आपली भूमिका मांडताना त्यांनी सत्ताबदलाच्या मुद्द्यावर ठाम समर्थन दर्शवले होते.

यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकशाही व्यवस्थेत सत्तापरिवर्तन हे निवडणुकांच्या माध्यमातूनच झाले पाहिजे, असे स्पष्ट केले. सत्तेत बदल घडवायचा असेल, तर निवडणुकीच्या रिंगणात उतरून जनतेची मने जिंकावी लागतील आणि निवडणुका जिंकाव्या लागतील, असे ते म्हणाले.



‘बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडल्याने पक्षात वादळ’

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना फडणवीस म्हणाले की, त्यांना स्वतःच्या पक्षातील बदल रोखता आले नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेल्या हिंदुत्वाच्या विचारांपासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने फारकत घेतली. त्यानंतर पक्षात मोठे वादळ निर्माण झाले. बाळासाहेबांच्या विचारांशी निष्ठा असलेल्या मोठ्या गटाने स्वतंत्र भूमिका घेत खरी शिवसेना स्थापन केली, असा दावा फडणवीस यांनी केला.

संविधानाच्या चौकटीत राहूनच देशातील निर्णय घेतले जातील. संसदेत आणि घटनात्मक प्रक्रियेतून निर्णय होणे अपेक्षित आहे; रस्त्यावर आंदोलन करून सत्तापरिवर्तन घडवण्याचा मार्ग योग्य नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘भारतात संविधानाविरोधातील मनसुबे यशस्वी होणार नाहीत’

रेजीम चेंजच्या चर्चेवर बोलताना फडणवीस यांनी नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तानमधील सत्ताबदलांच्या संदर्भांचाही उल्लेख केला. भारतातही अशा प्रकारे सत्तापरिवर्तन घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत, असे ते म्हणाले.

भारताला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आहे. त्यामुळे देशात सत्ताबदलासाठी लोकशाही आणि घटनात्मक प्रक्रियेचाच मार्ग स्वीकारावा लागेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, रेजीम चेंजच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, या विधानांमुळे राज्यातील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे.

Fadnavis warns the opposition over the issue of ‘regime change’

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात