विशेष प्रतिनिधी
पुणे : लोहगड किल्ल्यावरील दरीत ढकलून केतन अगरवाल याची हत्या केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी केतनचे वडील विशाल अगरवाल यांनी निकम यांच्या नियुक्तीसाठी गृह विभागाकडे पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या सचिवांना दिलेल्या सूचनेनंतर ही नियुक्ती करण्यात आली.
लोहगडावरील घटनेने खळबळ
१८ जून रोजी केतन अगरवाल याला लोहगड किल्ल्यावरील दरीत ढकलून त्याची हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात केतनची नियोजित पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली. सुरुवातीला केतनचा मृत्यू अपघातामुळे झाल्याचे भासविण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, पोलिसांच्या तपासात सिया आणि चेतन यांनी संगनमत करून हत्या केल्याचे उघडकीस आल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात चेतनचा मित्र रितेश हंगे याचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली.
५,०५३ पानी आरोपपत्र दाखल
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात आला. तपास पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी वडगाव मावळ न्यायालयात सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हंगे या तिघांविरुद्ध ५,०५३ पानी आरोपपत्र दाखल केले आहे.
या आरोपपत्रात डिजिटल पुरावे, तांत्रिक विश्लेषण अहवाल आणि १०० हून अधिक साक्षीदारांचे जबाब समाविष्ट आहेत. आरोपींच्या मोबाइलमधील डेटा, समाजमाध्यमांवरील संभाषणे, छायाचित्रे, कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तसेच तपासादरम्यान गोळा केलेल्या अन्य कागदपत्रांचाही त्यात समावेश आहे. काही महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ अंतर्गत नोंदविण्यात आले आहेत.
खटल्याच्या कामकाजाकडे लक्ष
या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्याने पुढील न्यायालयीन कामकाजाकडे लक्ष लागले आहे. आरोपपत्रातील पुरावे, साक्षीदारांची साक्ष आणि न्यायालयातील युक्तिवाद यांच्या आधारे या प्रकरणाचा निकाल लागणार आहे. आरोपींवरील आरोप सिद्ध होतात की नाही, याचा अंतिम निर्णय न्यायालय घेईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App