विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन व प्रसार करण्यासाठी टपाल विभागाने तयार केलेल्या ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष टपाल तिकिटाचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर वापर करावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात आयोजित ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष कार्यक्रमात ॲड. शेलार यांच्या हस्ते या विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल रामचंद्र किसन जायभाये, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांच्यासह गणेशभक्त आणि नागरिक उपस्थित होते.
गणेशोत्सवाला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या जागतिक अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत स्थान मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून, त्याअनुषंगाने विविध सांस्कृतिक उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेलार म्हणाले, धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या गणेशोत्सवामध्ये व्यापक लोकसहभाग, कल्पकता, नावीन्य, कलात्मकता आणि सामाजिक भान यांचा संगम पाहायला मिळतो. महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या प्रथा आणि परंपरा आता देशासह विदेशातही पोहोचल्या आहेत. या उत्सवाचे वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक मूल्य जगासमोर मांडण्यासाठी व्यापक व्यासपीठ निर्माण करण्याची गरज आहे.
‘मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महाविकास आघाडीने गुंडाळला’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप
राज्य महोत्सवातून विविध सांस्कृतिक उपक्रम
गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याचे शेलार यांनी सांगितले. रवींद्र नाट्य मंदिरात तीन दिवसांचा शास्त्रीय संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला असून, ओडिशा, अंदमान-निकोबार आणि दुबई येथेही राज्य महोत्सवांतर्गत कार्यक्रम घेण्यात आले आहेत.
सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यभर वर्षाकाठी एक हजारांहून अधिक कार्यक्रम आयोजित केले जातात. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे, त्याचे जतन व संवर्धन करणे तसेच त्याला जागतिक स्तरावर स्थान मिळवून देणे, हा या उपक्रमांचा उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘कस्टमाइज्ड माय स्टॅम्प’ ठरणार सांस्कृतिक स्मृतिचिन्ह
महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल रामचंद्र किसन जायभाये यांनी सांगितले की, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९३ मध्ये सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे काम केले. सांस्कृतिक कार्यक्रम, जनजागृती तसेच स्वातंत्र्यलढ्यातही या उत्सवाचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. आज गणेशोत्सव महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.
भारत सरकारचा टपाल विभाग टपाल तिकिटांच्या माध्यमातून देशाची कला, संस्कृती, परंपरा आणि इतिहासाचे जतन व प्रसारण करतो. ‘लोककलेतील श्रीगणेश’ या संकल्पनेवर आधारित ‘कस्टमाइज्ड माय स्टॅम्प’ हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे कायमस्वरूपी जतन करणारे फिलाटेलिक स्मृतिचिन्ह ठरेल, असे जायभाये यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे नव्या पिढीमध्ये टपाल तिकिटे आणि फिलाटेलीविषयी आवड निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
युनेस्को मानांकनासाठी माहिती संकलन सुरू
महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या जागतिक अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत स्थान मिळवून देण्यासाठी आवश्यक माहिती संकलनाचे काम सुरू असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी दिली. यावेळी त्यांनी कार्यक्रमाचे स्वागतपर प्रास्ताविक केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App