विशेष प्रतिनिधी
बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जसजशी रंगत चालली आहे, तसतसे कारखान्याच्या कारभारावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. शेतकरी कृती समितीच्या मेळाव्यात नेते सतीश काकडे यांनी कारखान्याच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्न उपस्थित करत, विद्यमान अध्यक्षांना पदावरून दूर करून कारभाराची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली. ३५-४० वर्षे एकाच व्यक्तीचा संचालक मंडळातील प्रभाव राहणे योग्य आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
कृती समितीच्या वतीने मंगळवारी (ता. २२) कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा घेण्यात आला. यावेळी काकडे बोलत होते. कारखान्याच्या आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करताना काकडे यांनी सीबीआय, एसआयटी किंवा ईडीसारख्या तपास यंत्रणांचा उल्लेख केला. कारखान्याच्या कारभारासंदर्भात आपल्याकडे काही माहिती व पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला असून, योग्य वेळी हे पुरावे समोर आणणार असल्याचे सांगितले. सोमेश्वर कारखाना निवडणुकीत शेतकरी कृती समिती कोणाच्या बाजूने उभी राहणार, याबाबतही काकडे यांनी भूमिका स्पष्ट केली. सूनेत्रा पवार यांच्या पाठीशी समिती ठामपणे राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र, केवळ निवडणुकीतील पाठिंब्यापुरता हा विषय मर्यादित नसल्याचे सांगत कारखान्याच्या कारभारात पारदर्शकता, सभासदांच्या प्रश्नांना न्याय आणि नेतृत्वात बदल हे मुद्दे महत्त्वाचे असल्याचे काकडे यांनी नमूद केले.
‘नव्या नेतृत्वाला संधी मिळावी’… दीर्घकाळ एकाच नेतृत्वाभोवती कारखान्याचा कारभार केंद्रित राहण्याऐवजी नव्या नेतृत्वाला संधी मिळणे आवश्यक असल्याची भूमिका कृती समितीने मांडली आहे. त्यामुळे सोमेश्वरच्या निवडणुकीत आता पॅनेलच्या लढतीसोबतच कारखान्याच्या कारभाराचा मुद्दाही प्रचाराच्या केंद्रस्थानी येताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App