विशेष प्रतिनिधी
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेतील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, २३ ऑक्टोबर रोजी मतदान तर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. पुणे, नागपूर आणि औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर विभागातील पदवीधर मतदारसंघांसह पुणे आणि अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघांचा या निवडणुकीत समावेश आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून, इच्छुक उमेदवारांकडूनही मोर्चेबांधणीला वेग येण्याची शक्यता आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार २९ सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार असून, त्याच दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर आहे.
७ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी केली जाईल, तर ९ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल आणि २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.
या पाचही मतदारसंघांतील विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपत आहे.
पदवीधर मतदारसंघांमध्ये पुण्यातून अरुण लाड, नागपूरमधून अभिजीत वंजारी आणि औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांचा समावेश आहे. शिक्षक मतदारसंघांमध्ये अमरावतीचे किरण सरनाईक आणि पुण्याचे जयंत आसगावकर यांचा कार्यकाळ संपणार आहे.
या निवडणुकीत पुणे विभागाला विशेष महत्त्व आहे. पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक अशा दोन स्वतंत्र मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयानेही २०२६ च्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी स्वतंत्र निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे.
निवडणूक कार्यक्रमामुळे आता उमेदवार निश्चिती, पक्षीय आघाड्या आणि प्रचाराच्या रणनीतींना वेग येणार असून, ९ ऑक्टोबरनंतर अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट होईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App