विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका सूचक सोशल मीडिया पोस्टने राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे. अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा संपल्यानंतर राज ठाकरे यांनी केलेल्या या पोस्टमध्ये कोणाचेही थेट नाव घेतलेले नाही. मात्र, त्यांच्या विधानाचा नेमका रोख कोणाकडे आहे, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक छोटी, मात्र लक्षवेधी पोस्ट केली. “कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, तूर्तास एवढेच,” असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. अवघ्या काही शब्दांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा नुकताच पार पडला आणि त्यानंतरच राज ठाकरे यांची ही पोस्ट समोर आली. त्यामुळे या पोस्टचा संबंध शाह यांच्या दौऱ्याशी, भाजपच्या भूमिकेशी किंवा महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांशी आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र, राज ठाकरे यांनी कोणाचेही नाव घेतले नसल्याने त्यांच्या विधानामागील नेमका संदर्भ अद्याप स्पष्ट झालेला नाही.
मनसे-भाजप समीकरण पुन्हा चर्चेत
राज ठाकरे यांच्या या सूचक विधानामुळे मनसे आणि भाजप यांच्यातील संभाव्य राजकीय समीकरणाचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू असताना राज ठाकरे यांच्या पोस्टला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते’ या म्हणीच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी आपल्यावर होणाऱ्या टीकेला किंवा विरोधकांच्या भूमिकेला सूचक प्रत्युत्तर दिले असावे, अशी चर्चा आहे. कोणाच्या दबावामुळे किंवा टीकेमुळे आपल्या भूमिकेवर परिणाम होणार नाही, असा संदेश त्यांनी या पोस्टमधून दिला आहे का, याचाही अंदाज बांधला जात आहे.
‘तूर्तास एवढेच’ या शब्दांमुळे उत्सुकता वाढली
राज ठाकरे यांनी पोस्टच्या शेवटी ‘तूर्तास एवढेच’ असे म्हटल्याने त्यांच्या पुढील भूमिकेकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ही केवळ एखाद्या घडामोडीवरील प्रतिक्रिया आहे की आगामी राजकीय निर्णयाचा संकेत आहे, याबाबत आता चर्चा रंगली आहे.
अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा, त्यानंतर राज ठाकरे यांची सूचक पोस्ट आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय हालचाली यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. आता राज ठाकरे यांच्या या विधानावर भाजप किंवा अन्य राजकीय नेत्यांकडून काही प्रतिक्रिया येते का, तसेच मनसेची पुढील भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App