विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच करण्याची तयारी करणारे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. १९ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यासाठी मागितलेली परवानगी आझाद मैदान पोलिसांनी नाकारली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठी गर्दी होण्याची शक्यता, वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक सुव्यवस्था आणि सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र, पोलिसांच्या या निर्णयानंतरही जरांगे पाटील यांनी आंदोलन थांबवणार नसल्याची आक्रमक भूमिका घेतली आहे. Manoj Jarange
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी १५ सप्टेंबरपासून ‘मुंबई चलो’ आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबईत आंदोलनासाठी त्यांनी आझाद मैदानाची निवड केली होती. आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येईल तसेच पोलिसांकडून घालण्यात येणाऱ्या सर्व अटी आणि शर्तींचे पालन केले जाईल, असे हमीपत्रही देण्यात आले होते. तरीही पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आता आंदोलनाची पुढील दिशा काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आझाद मैदान पोलिसांनी परवानगी का नाकारली?
पोलिसांनी परवानगी नाकारताना दक्षिण मुंबईतील शाळा, रुग्णालये, व्यवसाय, न्यायालयीन कामकाज, सार्वजनिक वाहतूक आणि आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे नमूद केले आहे. मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाल्यास सार्वजनिक सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.
याशिवाय सध्या मुंबईत गणेशोत्सवाचा कालावधी असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची आणि गणेशभक्तांची गर्दी असते. या काळात पोलिसांवर सुरक्षेची अतिरिक्त जबाबदारी असते. अशा परिस्थितीत मोठ्या आंदोलनामुळे पोलिस यंत्रणेवर आणखी ताण येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
यापूर्वीच्या आंदोलनाचा दाखला
मनोज जरांगे यांच्या यापूर्वीच्या मुंबई आंदोलनाचा दाखलाही पोलिसांनी दिला आहे. त्या वेळी मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईच्या रस्त्यावर उतरल्याने वाहतूक कोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे पोलिसांच्या निर्णयात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे यावेळी आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘काय व्हायचे ते मुंबईतच होणार’
दरम्यान, पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारला गोरगरिबांची अजिबात कदर नाही, असा आरोप करत त्यांनी सरकारला तब्बल तीन वर्षे संधी दिल्याचे म्हटले आहे.
“आता काय व्हायचे ते मुंबईतच होणार. आम्हाला जेलमध्ये टाकले तरी चालेल; पण हे आंदोलन आता थांबणार नाही,” असा आक्रमक इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
त्यामुळे आझाद मैदानासाठी पोलिसांची परवानगी नाकारण्यात आली असली तरी जरांगे पाटील आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बावनकुळेंवरही जरांगेंचा निशाणा
या वेळी जरांगे पाटील यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. “बावनकुळे तुम्ही सावध राहा, ते बाईच्या पदराआडून डाव टाकत आहेत,” असे म्हणत त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले.
प्रसाद लाड यांच्यामुळे बावनकुळे यांना आपण यापूर्वी सोडले होते, असेही जरांगे म्हणाले. शेतकरी गेल्यानंतर ‘सुट्टी आहे’ असे सांगणारे अधिकारी आता शनिवारी आणि रविवारीही काम करू लागले आहेत. आंदोलनाच्या काळातच या चौकशा का सुरू झाल्या, हे संपूर्ण महाराष्ट्राला कळत असल्याचा दावा त्यांनी केला.
‘कितीही चौकशा करा, मला फरक पडत नाही’
आपल्या सहकाऱ्यांवरील चौकशांच्या मुद्द्यावरही जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली. सरकारने कितीही चौकशा केल्या तरी आपल्याला फरक पडत नसल्याचे त्यांनी म्हटले.
आपल्या सहकाऱ्यांना यापूर्वीच चौकशीचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा दिला होता. भीती वाटत असेल तर आपल्याला सोडा, असेही त्यांना सांगितले होते. मात्र, सहकारी आपल्या सोबत राहिले, असे जरांगे यांनी सांगितले.
“मला आणि माझ्या सहकाऱ्यांना माझा समाज तुकडे घालेल, सांभाळून घेईल,” असे म्हणत त्यांनी आपल्या आंदोलनाला समाजाचा पाठिंबा असल्याचा दावा केला.
आंदोलनाची पुढील दिशा काय?
एकीकडे पोलिसांनी आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली आहे, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन थांबवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता ‘मुंबई चलो’ आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, आंदोलक कुठे जमणार आणि प्रशासन यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आधीच राज्यातील वातावरण तापलेले असताना आझाद मैदानाची परवानगी नाकारल्याने संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष कोणते वळण घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App