मुंबईत जरांगेंची एंट्री रोखणार कोण? हायकोर्टाने दिला मोठा निर्णय

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. आपल्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. अंतरवाली सराटी येथे गेल्या १४ दिवसांपासून त्यांचे आमरण उपोषण सुरू असून, अद्याप मागण्यांवर ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे १२ सप्टेंबरनंतर मुंबईत धडक देण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान, जरांगे पाटील यांच्या संभाव्य मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात त्यांना आंदोलनाची परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने महत्त्वपूर्ण भूमिका मांडत जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यास मनाई करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्या मुंबईतील आंदोलनाचा मार्ग मोकळा झाला आहे.



मागील आंदोलनातील परिस्थितीचा दाखला देत यावेळी जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून रोखण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, केवळ मागील घटनांच्या आधारे यंदा परवानगी नाकारता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. आंदोलन करणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या मुंबई प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली.

जरांगे पाटील यांच्या संभाव्य मुंबई आंदोलनाला विरोध करणारी याचिका निलेश डहाणूकर आणि राजेश दळवी यांनी दाखल केली होती. आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी देऊ नये, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. मागील आंदोलनावेळी आंदोलकांनी दक्षिण मुंबईतील मोठा परिसर व्यापला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उच्च न्यायालयालाच आझाद मैदान रिकामे करण्याचे आदेश द्यावे लागले होते, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला.

या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती महेश त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यास मनाई करण्याचे आदेश देण्यास नकार दिला. त्यामुळे याचिकाकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल आणि मुंबईत दाखल झाल्यानंतर जरांगे पाटील कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

High Court clears way for Manoj Jarange’s Mumbai protest

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात