विशेष प्रतिनिधी
मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या स्वरांचा जादुई प्रवास अनेक दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यांचा आवाज आणि त्यांनी दिलेला सांगीतिक वारसा यापुढेही कित्येक पिढ्यांना आनंद देत राहील, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
आशा भोसले यांच्या ९३व्या जन्मदिनानिमित्त संगीतकार ए. आर. रहमान यांनी तयार केलेल्या ‘आशा फॉरएव्हर’ या गीताचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, संगीतकार ए. आर. रहमान, आशा भोसले यांची नात जनाई भोसले यांच्यासह भोसले कुटुंबीय तसेच चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आशाजींचे संपूर्ण आयुष्य आनंद, उत्साह आणि चैतन्याने भरलेले होते. वयाच्या नव्वदीतही त्या मंचावर सादरीकरण करताना तितक्याच उत्साहाने आणि ऊर्जेने वावरत असत. त्यांच्यातील जीवनाविषयीचे प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा नेहमीच प्रेरणादायी राहिली.
‘आशा फॉरएव्हर’ ही सुंदर स्वरांजली
अनेक दशकांपासून आपल्या स्वरांनी रसिकांना आनंद देणाऱ्या आशा भोसले यांच्या आठवणी आणि समृद्ध सांगीतिक वारसा जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. याच भावनेतून ‘आशा फॉरएव्हर’ हे गीत तयार करण्यात आले असून, ही त्यांना दिलेली सुंदर स्वरांजली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
“आशाजींचा आवाज ही कधीही न संपणारी अनुभूती आहे. जोपर्यंत त्यांची गाणी ऐकली जातील, तोपर्यंत त्या रसिकांच्या मनात कायम जिवंत राहतील. त्यांच्या आठवणी आणि सांगीतिक वारसा जपण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन दरवर्षी व्हावे,” अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
‘आशा फॉरएव्हर’च्या निर्मितीसाठी संगीतकार ए. आर. रहमान, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार आणि संपूर्ण टीमचे फडणवीस यांनी अभिनंदन केले.
आशाजींचा आवाज जगभर पोहोचला – आशिष शेलार
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, आशा भोसले यांचे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाशी तसेच देश-विदेशातील संगीतप्रेमींशी अतूट नाते आहे. त्यांनी मराठीसह विविध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये गाणी गायली. त्यांच्या स्वरांनी भारतीय संगीताला जागतिक स्तरावर स्वतंत्र ओळख मिळवून दिली.
‘आशा फॉरएव्हर’ म्हणजे विनम्र अभिवादन – ए. आर. रहमान
संगीतकार ए. आर. रहमान यांनी ‘आशा फॉरएव्हर’ हे गीत आशा भोसले यांना विनम्र अभिवादन असल्याचे सांगितले. “आशाजी या महाराष्ट्राच्या, भारताच्या आणि संपूर्ण जगाच्या कन्या आहेत. त्यांचा आवाज आणि सांगीतिक वारसा सदैव जिवंत राहील,” असे रहमान म्हणाले.
यावेळी जनाई भोसले यांनी गीताच्या निर्मितीमागील संकल्पना आणि प्रक्रियेबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘आशा फॉरएव्हर’ गीताचे बटण दाबून अधिकृत प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर या गीताचे दृकश्राव्य सादरीकरणही करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App