विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणातील आरोपी ऋतुजा पाटील हिच्या कथित व्हॉट्सअॅप संभाषणातून पेपर मिळवण्यासाठी तब्बल 50 लाख रुपये दिल्याचा दावा समोर आलाआहे. पेपरफुटीच्या व्यवहारातील ‘बड्या किड्यां’पर्यंत तपास पोहोचला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाची चाळणी परीक्षा 22 मार्च 2026 रोजी घेण्यात आली होती. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न बाहेर आल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला. प्रश्न मिळवण्यासाठी 12 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आता ऋतुजा पाटीलच्या कथित संभाषणातील माहितीमुळे पेपरफुटीच्या व्यवहाराची व्याप्ती अधिक मोठी असल्याचा संशय निर्माण झाला आहे. ऋतुजाने मैत्रिणीसोबत केलेल्या संभाषणात औषध निरीक्षक पदाचा पेपर मिळवण्यासाठी 50 लाख रुपये दिल्याचा दावा केल्याचे सांगितले जात आहे. ऋतुजा पाटील हिला परीक्षेपूर्वी 77 प्रश्न मिळाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. तिचे वडील अमृत पाटील यांनी या प्रश्नांसाठी १२ लाख रुपये दिल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष असल्याचे सांगितले जात आहे.ऋतुजाच्या लग्नासाठी जमवलेली रक्कम तिच्या औषध निरीक्षक होण्यासाठी वापरण्यात आली. ऋतुजाला मिळालेल्या प्रश्नांपैकी मोठ्या संख्येने प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत आल्याचा दावा तपास यंत्रणेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकेची गोपनीयता नेमकी कुठे भंग झाली आणि एमपीएससीच्या यंत्रणेतील कोणत्या स्तरावरून प्रश्न बाहेर गेले, हा तपासाचा मुख्य मुद्दा बनला आहे.
कथित व्हॉट्सअप संभाषणातून ऋतुजाला प्रश्नांचा संच दिल्यानंतर त्यातील काही प्रश्न मुद्दाम चुकीचे सोडवण्याचा सल्ला देण्यात आला, जेणेकरून तिच्यावर संशय येणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. ऋतुजाने संभाषणात तिला मिळालेल्या प्रश्नांपैकी अनेक प्रश्न परीक्षेत आल्याचे सांगितल्याचे नमूद करण्यात आले आहे. तिने मिळालेल्या प्रश्नांपैकी 78 प्रश्नांची उत्तरे खात्रीने सोडवल्याचा उल्लेख संभाषणात असल्याचे सांगितले जात आहे.
पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत एमपीएससीशी संबंधित तीन अधिकारी पोलिसांच्या ताब्यात आहेत. याशिवाय नंदुरबार येथील कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण पाटील, ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील आणि लोकेश ऊर्फ गौरव राजेंद्र पाटील यांनाही अटक करण्यात आली आहे. या आरोपींच्या चौकशीतून पेपरफुटीची पद्धत, आर्थिक व्यवहार आणि प्रश्न किती जणांना पुरवण्यात आले याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही संशयितांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय असून त्यांचा शोध सुरू आहे.
तपासादरम्यान काही आरोपींनी पोलिसांना जुने मोबाइल देण्याऐवजी नवीन मोबाइल दिल्याचे समोर आले आहे. परीक्षेच्या काळात वापरलेले मोबाइल खराब झाल्याचे कारण आरोपींकडून सांगण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे जुन्या मोबाइलमधील डेटा, संभाषण आणि आर्थिक व्यवहाराशी संबंधित डिजिटल पुरावे मिळवणे तपासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
पेपरफुटीच्या तपासातून पुढे येणारे तपशील अत्यंत धक्कादायक असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. “50 लाख घेऊन पेपर देणाऱ्या सिस्टिममधील या किड्यांपर्यंत तपास पोहोचला पाहिजे. अन्यथा एकही किडा लपून राहिला किंवा सरकारने त्याला वाचवला तर तो आणखी किड्यांची पैदास केल्याशिवाय राहणार नाही,” अशी टीका रोहित पवार यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App